कल्याण: आयुक्त कार्यालयातील आंदोलनप्रकरणी 25 जणांवर गुन्हे

सुचिता करमरकर
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पोलिस तपासात नगरसेवकांची अधिक नावे जोडली जाण्याची शक्यता आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये 17 महिला नगरसेविकांसह 8 नगरसेवकांचा समावेश आहे. दोन वर्षे उलटूनही प्रभागात छोटी कामे होत नसल्याचे सांगत शिवसेनेच्या संतप्त नगरसेवक आणि नगरसेविकांनी आयुक्त कार्यालयावर काल हल्लाबोल केला. त्यात आयुक्त हटावच्या घोषणाबाजीसह आयुक्तांची खुर्चीही भिरकावण्यात आली होती.

कल्याण : कामे होत नसल्याने संतापलेल्या शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात केलेल्या आंदोलनप्रकरणी  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाजारपेठ पोलिसांनी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या क्लिपनंतर हे गुन्हे दाखल केल्याचे समजते आहे.

पोलिस तपासात नगरसेवकांची अधिक नावे जोडली जाण्याची शक्यता आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये 17 महिला नगरसेविकांसह 8 नगरसेवकांचा समावेश आहे. दोन वर्षे उलटूनही प्रभागात छोटी कामे होत नसल्याचे सांगत शिवसेनेच्या संतप्त नगरसेवक आणि नगरसेविकांनी आयुक्त कार्यालयावर काल हल्लाबोल केला. त्यात आयुक्त हटावच्या घोषणाबाजीसह आयुक्तांची खुर्चीही भिरकावण्यात आली होती. त्याप्रकरणी काल रात्री उशिराने बाजारपेठ पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांच्यावर आयपीसी 142, 143, 145, 146, 147, 149 कायद्याचे उल्लंघन-भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांनी  दिली. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत असून आणखी काही जणांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, दशरथ घाडीगांवकर, प्रकाश पेणकर, सुधीर बासरे, मोहन उगले, गणेश कोट,छाया वाघमारे, माजी महापौर वैजयंती घोलप, सोनी अहिरे, शालिनी वायले, रजनी मुरकुटे, मनीषा तारे, नीलिमा पाटील, प्रियांका भोईर, मीना जाधव, गुलाब म्हात्रे, पूजा म्हात्रे, लाजवंती मढवी, सुशीला माळी, संगीता गायकवाड, प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर,शकीला खान यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. आयुक्तांबरोबर या आंदोलनकर्त्यांनी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान स्थानिक पोलिसांनी चित्रीकरण केले होते. या आधारावर हे गुन्हे दाखल केले जात आहेत. या आंदोलनात उशीराने सहभागी झालेल्या वैजयंती घोलप यांच्यावरही यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Kalyan news case filed against ShivSena corporaters