डेंगीच्या अळ्या सापडल्यास गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कल्याण - डेंगी-मलेरियाला रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांविरोधात सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवलीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. 16) दिले आहेत. पालिका प्रशासनाच्या या कडक पवित्र्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. 

कल्याण - डेंगी-मलेरियाला रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांविरोधात सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवलीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. 16) दिले आहेत. पालिका प्रशासनाच्या या कडक पवित्र्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. 

"महापालिकेच्या डॉक्‍टरला डेंगी' या मथळ्याखाली सोमवारच्या (ता. 16) अंकात बातमी प्रसिद्ध झाली होती. पालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉ. सीमा जाधव यांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत डेंगी, मलेरिया व अन्य साथीच्या आजारांबाबत नागरिकांमध्ये जागृती करा. रुग्ण आढळल्यास संबंधित परिसरात सर्वेक्षण करून डेंगीच्या अळ्या सापडल्यास संबंधित सोसायटी, बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावा. त्यानंतरही उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास बेपर्वाईबद्दल नागरिक किंवा बांधकाम व्यावसायिकांविरोधात सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे आदेश घरत यांनी दिले. 

कारंजात सापडल्या अळ्या 
डॉ. सीमा जाधव राहत असलेल्या संकुलामध्ये असलेल्या स्वीमिंग पूल आणि कारंजे परिसराची पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी (ता. 16) पाहणी केली. कारंजे असलेल्या ठिकाणी पाण्यात डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. तेथील पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच संबंधित सोसायटीला उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत सोसायटीला नोटीस देण्यात येणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. 

अनपेक्षित पाऊस व वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डेंगीने पुन्हा डोके वर काढले आहे. नागरिकांनी ताप आल्यास त्वरित नजीकच्या रुग्णालयात संपर्क साधून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांत रक्‍ततपासणी करावी. घरातील पाणी साठे आठवड्यातून एकदा स्वच्छ करावेत. पाणी साठ्यांना झाकणे लावावीत किंवा झाकून ठेवावेत. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळल्यास डेंगीला प्रतिबंध करणे शक्‍य होईल. 
- डॉ. स्मिता रोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

Web Title: kalyan news dengue kdmc