कल्याण: अखेर लालपरी रस्त्यावर धावली

ST bus
ST bus

कल्याण : लालपरी असलेल्या एसटी बस अखेर कल्याण एसटी डेपोमधून सुरू झाली मात्र उशिराने धावत होती. उशिरा का होईना तब्बल चार दिवस बसेस सुरू झाल्याने प्रवाश्यानी सुटकेचा श्वास सोडला.

सोमवारच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्याच्या संपला सुरुवात झाली. कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी डेपोमधून एकही बस न सुटल्याने लांब पल्ल्यात राहणाऱ्या प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल झाले. कल्याण एसटी डेपोमधील कर्मचारी वर्गाने प्रशासन विरोधात भीक मांगो, मुंडन आणि खासगी बसेस अडवून आपला रोष व्यक्त केला. संप काळात अडकलेल्या एसटी कर्मचारी आणि प्रवाशांना स्थानिक संपकरी कर्मचाऱ्यानी जेवणाची व्यवस्था करत मदतीचा हात दिला. 

संप काळात नागरिकांना त्रास होऊ नये आणि त्यांच्या मदतीसाठी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी कल्याण, मुरबाड आणि विठ्ठलवाडी डेपोमध्ये विशेष पथकाची नेमणूक करत चार दिवसात 300 हुन अधिक खासगी बसेस सोडत प्रवाशांना मदतीचा हात दिला. तर यावेळी केडीएमटीने ही ज्यादा बसेस सोडून नागरिकांना मदतीचा हात दिला.

शुक्रवारी मध्यरात्री एसटीचा संप मागे घेतल्याची बातम्या पसरू लागताच अनेकांनी शनिवार पहाटेपासून कल्याण एसटी डेपोमध्ये धाव घेत आपला प्रवास केला. गाव तेथे एसटी बस हे ब्रीद वाक्य मागील चार दिवसात खरे ठरले. बस बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान आज सकाळपासून कल्याण एसटी डेपोमधून बसेस सुरू झाल्या. पहिल्या सत्रात लांब पल्ल्याच्या अडकलेल्या बसेस सोडण्यात आल्या त्याही तुडुंब भरून गेल्या. तर चार दिवस आरक्षित तिकिटावर प्रवास करता न आल्याने तिकीट रद्द करून नव्याने बुकिंग करण्यासाठी नागरिकांची लांबलचक रांग लागली होती. संप मिटल्यावर लालपरी बस सुरू झाली मात्र थोड्या उशिराने धावत होत्या. दुपारपर्यंत 40 ते 50 बसेस बाहेर काढण्यात कल्याण एसटी डेपो प्रशासनाला यश आले. अनेक कर्मचारी आणि बसेस संपामुळे अडकल्याने ते पुन्हा येण्यासाठी आज रात्रीपर्यंत ते पुन्हा येतील तद्नंतर उद्या रविवार आणि सोमवार सकाळ पर्यन्त बससेवा सुरळीत होईल असा दावा प्रशासनाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com