कल्याण रेल्वे स्थानकाचा 'लूक' बदलणार ; स्थानक पुनर्बांधणीसाठी 960 कोटींची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

डोंबिवलीमधील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती अय्यर यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कल्याण रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे महिला शौचालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीन बसविण्यात आली आहे.

कल्याण, ता. 24 (बातमीदार) : कल्याण रेल्वेस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सुमारे 960 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे भविष्यात कल्याण स्थानकाचे रूपडे पालटणार आहे. महिलांसाठीही लोकल वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या लोकल आणि मेलमध्येही महिला डब्बे वाढविले असून, भविष्यात विशेष महिला लोकल अधिकाधिक सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी शनिवारी दिली. 

डोंबिवलीमधील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती अय्यर यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कल्याण रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे महिला शौचालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीन बसविण्यात आली आहे. त्याचे उद्‌घाटन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते झाले.

या वेळी विभागीय व्यवस्थापक संजय जैन, सुरक्षा बलाचे आयुक्त सचिन भलोदे, आमदार नरेंद्र पवार, कल्याण स्टेशन डायरेक्‍टर विरेश्वर सिंग, स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास, कल्याण-कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांच्यासमवेत मध्य रेल्वेचे विविध विभागाचे अधिकारी, सुरक्षा बलाचे अधिकारी, रेल्वे पोलिस अधिकारी, प्रवासी संघटना, महिला सामाजिक संघटना पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांचे कौतुक 

केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल मुंबईमधील असल्याने त्यांना रेल्वेच्या अनेक समस्यांची जाण आहे. त्यामुळे सुमारे 55 हजार कोटींची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. परळ येथे कोचिंग टर्मिनसचे काम लवकरच सुरू होईल. कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. तर कल्याण-टिटवाळा चौथ्या मार्गाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. कल्याणमधील शाळेच्या विद्यार्थ्यांनी कल्याण स्थानकात रंगरंगोटीद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचेही कौतुक केले. 

 
 

Web Title: Kalyan Rail Station will change look reconstruction will give 960 Crores