कल्याण रेल्वे स्थानकाचे एअरपोर्टप्रमाणे विकासाचे उद्दिष्ट  : खासदार कपिल पाटील

रविंद्र खरात 
बुधवार, 27 जून 2018

कल्याण : दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकाचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीकोनातून आराखड्याचा प्रस्ताव सादर करुन रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळविली जाईल, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज दिली. त्याआधी रेल्वे स्थानकातील अस्वच्छता व गैरसोयीने संतप्त झालेल्या खासदार पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कल्याण : दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या कल्याण रेल्वेस्थानकाचा एअरपोर्टच्या धर्तीवर विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीकोनातून आराखड्याचा प्रस्ताव सादर करुन रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळविली जाईल, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज दिली. त्याआधी रेल्वे स्थानकातील अस्वच्छता व गैरसोयीने संतप्त झालेल्या खासदार पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कल्याण रेल्वे स्थानकाची खासदार पाटील यांनी आज मंगळवार (ता 26 जून)अचानक पाहणी केली. या वेळी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, वरुण पाटील, अर्जून भोईर आदी उपस्थित होते. रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म, आरक्षण केंद्र, तिकीट केंद्र, बंद पडलेल्या एटीव्हीएम मशीन, स्वच्छतागृहे, तिकीट तपासनीस कार्यालय आदींची पाहणी करुन रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. त्यानंतर स्थानकातील गैरसोयींविरोधात रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे तक्रार करुन गैरसोयी दूर करण्याची मागणी केली. सुमारे 15 दिवसांनंतर आपण पुन्हा रेल्वे स्थानकाचा दौरा करणार असल्याचेही खासदार पाटील यांनी जाहीर केले.

रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरील वाढते फेरीवाले व दुरवस्थेबद्दल खासदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तातडीने महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याबरोबरच रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फेरीवाल्यांना हटविण्याची सुचना केली. तसेच स्कायवॉकच्या दुरुस्तीची सुचना केली. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सुचनाही त्यांनी केली. रेल्वे तिकीट गृहातील 30 पैकी 10 एटीव्हीएम मशीन बंद असल्याबद्दल खासदार पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर तातडीने दुरुस्तीची सुचना केली.

खासदार पाटील यांनी रेल्वे प्रवाशांशीही संवाद साधला. प्रथम वर्गातील प्रवाशांनी डब्यात विनातिकीट प्रवाशी येत असल्याची तक्रार केली. रेल्वे टीसींकडून तपासणी होत नसल्याने दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे ट्रॅकमधील कचरा, दरवाजात उभ्या प्रवाशांची दांडगाई आदी तक्रारीही प्रवाशांनी केल्या. त्यानंतर खासदार यांनी तिकीट तपासनींच्या कार्यालयाला भेट देऊन प्रथम वर्गाच्या डब्यात तपासणी वाढविण्याची सुचना केली. या वेळी तिकीट तपासनीसांकडून कार्यालयाची दुरवस्था झाल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.

लांब पल्ल्याच्या आरक्षणास तासभर आधी टोकन देणार
आरक्षण केंद्रामध्ये तत्काळ तिकीटाच्या आरक्षणाचे टोकन मिळविण्यासाठी पहाटे चारपासून रांग लावावी लागत असल्याची प्रवाशांनी केली. त्यावर तत्काळ खासदार पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सुमारे तासभर आधी टोकन देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण मुंबई विभागात केली जाणार आहे. आरक्षण केंद्राच्या परिसरातील दलालांना हटविण्याची सुचनाही खासदार पाटील यांनी केली.

...तर दर 15 दिवसांनी दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांकडून कामे केली जात नाही, याबद्दल खासदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आजच्या दौऱ्यानंतर सुचविलेली कामे पूर्ण करावीत. अन्यथा, आम्हाला आमदार व लोकप्रतिनिधींबरोबरच दर 15 दिवसाने रेल्वे स्थानकाचा दौरा करावा लागेल, असा इशारा खासदार पाटील यांनी दिला.

Web Title: Kalyan railway station's development plan aims is like airport development said MP Kapil Patil