...तर कल्याण-टिटवाळा प्रवास सुस्साट!

...तर कल्याण-टिटवाळा प्रवास सुस्साट!

कल्याण : कल्याण शहरातील दुर्गामाता चौकापासून टिटवाळ्यापर्यंतच्या टप्प्यातील रिंग रोडचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज कल्याण-डोंबिवली शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात झालेल्या या आढावा बैठकीला प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह रेल्वेचे अधिकारीही उपस्थित होते. 

रिंग रोडच्या टप्पा क्रमांक चार ते सात या 17 किलोमीटरच्या कामाचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या भागातील भूसंपादन प्रक्रिया 80 टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. मात्र बल्याणी परिसरातील काही चाळी, कचरा डेपो, तसेच एका खासगी पेपर मिलचे भूसंपादन शिल्लक आहे.

हे भूसंपादन पालिकेने जलदगतीने केल्यास जूनपर्यंत काम पूर्ण होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रिंग रोडमधील मोठागाव ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया 80 टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत लवकरच मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाईल, असे खासदार शिंदे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावरून रिंग रोडला जोडणारा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुलामुळे कल्याण पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणाऱ्या पत्रिपुलालाही उत्तम पर्याय मिळेल. भाजप काळात 27 गावांपैकी 10 गावांमध्ये ग्रोथ सेंटर प्रस्तावित करण्यात आले होते. रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम या प्रस्तावित ग्रोथ सेंटरमध्ये आहे.

यातील काही त्रुटी आणि अडचणी दूर करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातील, असेही खासदार शिंदे यांनी सांगितले. प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पामध्ये जेथे जंक्‍शन येणार आहेत तेथे उड्डाणपूल तर रेल्वे लाईनवर पूल तयार केले जावेत, अशा सूचनाही प्राधिकरणाला करण्यात आल्या आहेत. 

लोकग्राम पूल सिद्धार्थनगर स्कायवॉकला जोडणार 
कल्याण पूर्वेतील सध्याच्या लोकग्राम पुलाला समांतर पूल तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा नवीन पूल सिद्धार्थनगर स्कायवॉकला जोडला जाणार आहे. त्यामुळे या पुलाचा वापर लोकग्राम परिसराबरोबरच कल्याण पूर्वेतील इतर नागरिकांनाही होणार आहे; परंतु कल्याण यार्डाच्या पुनर्विकासाचा आराखडा लक्षात घेऊन या नवीन पुलाचे बांधकाम केले जाईल.

यासाठी सोमवारी (ता.6) पालिका आयुक्त गोविंद बोडके, खासदार श्रीकांत शिंदे, तसेच रेल्वेचे संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत. या कामासाठी पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधी मंजूर केला आहे. तसेच कोपर पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 25 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन या कामाला सुरुवात होईल. यासाठी पालिकेने 8.92 कोटी इतक्‍या रकमेची तरतूद केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com