कर्जत-पुणे रेल्वेमार्ग दुसऱ्या दिवशीही बंदच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

ट्रॅक दुरुस्तीनंतर वाहतूक आज सुरू होण्याची शक्यता

नेरळ : रविवारी झालेल्या धुवांधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली कर्जत-पुणे दरम्यानची वाहतूक ४८ तासांनंतरही बंदच आहे. तीन मालगाड्या भरून दगड आणि खडीचा वापर करून सोमवारी सायंकाळी रेल्वे लाईन दुरुस्त केल्यानंतर या दुरुस्त केलेल्या रेल्वेलाईनवरून मालगाडीची यशस्वी ट्रायल घेतल्यानंतरच मंगळवारी ही वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

रविवारी सकाळी मुख्य लाईनपासून काही अंतरावर वाहणाऱ्या उल्हास नदीचे पुराचे पाणी नेरळ आणि शेलू रेल्वे स्थानकांदरम्यान नेरळकडील ३०० मीटर डाऊन मार्गाखालून गेल्याने या मार्गावरील मातीचा भराव तसेच दगड आणि खडीदेखील मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती.

तसेच पहाटेपासून या भागातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने रविवारी दिवसभर एकही गाडी या मार्गावरून पुढे गेली नाही. हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी पीडब्ल्यूआय विभागाने ३०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने दगड टाकून पडलेले खड्डे भरले.

पीडब्ल्यूआय विभागाचे वरिष्ठ अभियंता वाय. पी. सिंग यांनी स्वत: उभे राहून रेल्वेलाईन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. या दुरुस्ती कामानंतर सोमवारी सायंकाळनंतर मालगाडीची वाहतुकीची ट्रायल घेतल्यानंतर मंगळवारी वाहतूक सुरळीत सुरू होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat-Pune Railway closed for next day