कर्जत अत्याचारप्रकरण ; आणखी चार मुलींवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

कर्जतमधील सरकारमान्य विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयातील दोन कर्णबधिर अल्पवयीन मुलींवर शाळेतील काळजीवाहकाने अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले होते.

नेरळ : कर्जतमधील सरकारमान्य विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयातील दोन कर्णबधिर अल्पवयीन मुलींवर शाळेतील काळजीवाहकाने अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले होते. या शाळेतील मुलींची आरोग्य तपासणी केल्यानंतर आणखी चार मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. 

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सरकारमान्य विनोबा मिशन संचलित विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालयाची शाळा आहे. शाळेतील सात व 10 वर्षांच्या दोन कर्णबधिर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची माहिती 28 मार्चला समोर आली होती. या शाळेतील काळजीवाहक राम बेंबरे याने या मुलींवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आल्याने त्याला ताब्यात घेतले. बेंबरेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शाळेत घडलेल्या अत्याचाराची जबाबदारी म्हणून शाळेचा अधीक्षक सुभाष पाटील व मुख्याध्यापिका विमल मुंढे यांच्यावर पोलिसांनी 2 एप्रिलला गुन्हा दाखल केला होता; मात्र न्यायालयाने त्यांची 3 एप्रिलला जामिनावर सुटका केली. 
शाळेच्या पटावर 22 मुले व 18 मुली अशी 40 विद्यार्थ्यांची संख्या आहे. 

पालकांनी आमच्या मुलांची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी शाळेतील सहा मुलींची आरोग्य तपासणी केली. यामध्ये सहापैकी चार मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. याच शाळेतील एक विद्यार्थिनी होळीपासून शाळेत येत नाही. ती शाळेत का येत नाही, याचा तपास करणे आवश्‍यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. 

Web Title: Karjat Rape Case 4 Girls Sexual harassment