शिवसेनेच्या "करून दाखवलं'चा पर्दाफाश 

सुजित गायकवाड 
मंगळवार, 23 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरत त्यांनी घाईघाईत 10 मार्चला या कार्यालयाच्या फलकाचे अनावरणही केले.

नवी मुंबई - वाशीतील टपाल कार्यालयातील पारपत्र कार्यालयाचे नुकतेच शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरत त्यांनी घाईघाईत 10 मार्चला या कार्यालयाच्या फलकाचे अनावरणही केले. मात्र, त्यास महिना उलटल्यानंतरही पारपत्र विभागाने कर्मचारीच नेमलेले नसल्याने या कार्यालयातील कामकाजाला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे पद व कर्मचारी संख्येस मंजुरी मिळालेली नसतानाही शिवसेनेने केवळ "चुनावी जुमला' म्हणून उद्‌घाटनाचा हा सोहळा उरकला का, असा संतप्त सवाल नवी मुंबईतील नागरिक करत आहेत. 

नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात कुठेही पारपत्र कार्यालय नसल्याने परिसरातील नागरिकांना पारपत्रासंबंधित कामासाठी मुंबई किंवा ठाण्यातील कार्यालयांत खेटे घालावे लागतात. त्यामुळे नवी मुंबईत पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या नव्या पारपत्र कार्यालयांच्या यादीत वाशीतील कार्यालयाचा समावेश होता. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळाला होता; मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर येऊनही हे कार्यालय सुरू होत नव्हते. 

या पार्श्‍वभूमीवर विचारे यांनी 10 मार्चला शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने वाशीतील टपाल कार्यालयाच्या इमारतीवर पारपत्र कार्यालयाचे फलक लावले. त्यानंतर त्यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्‌घाटनही झाले. ते करताना हा दिवस रविवार आहे. त्यादिवशी सरकारी कार्यालये बंद असतात, याचे भानही या मंडळींना राहिले नाही. हा सोहळा झाल्यानंतर त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर "व्हायरल' करत "करून दाखवलं' असा डिंडोराही त्यांनी पिटला. मात्र, "टीम सकाळ'ने सोमवारी (ता. 22) वाशीतील टपाल कार्यालयात जाऊन पारपत्र कार्यालयाबाबत चौकशी केली असता हे कार्यालय सुरूच झाले नसल्याचे उघड झाले. 

टपाल कार्यालयाच्या एका कोपऱ्यात पारपत्र कार्यालयाला जागा देण्यात आली आहे. मात्र, तेथे सध्या टपाल विभागाची कागदपत्रे गोळा केली जात आहेत. पारपत्रासाठी अर्ज द्यायचा कुठे, असा प्रश्‍न "टीम सकाळ'ने टपाल कर्मचाऱ्यांना विचारला असता, पारपत्र विभागाने कर्मचारीच नेमलेले नाहीत. आम्हालाही पारपत्र कार्यालयाच्या कामकाजाचे प्रशिक्षण मिळालेले नाही. मुळात या कार्यालयाचे उद्‌घाटन कधी झाले, हेही आम्हाला समजले नाही, असे उत्तर मिळाले. 

याबाबत प्रतिक्रियेसाठी "टीम सकाळ'ने विचारे यांच्याशी संपर्क केला. मात्र, ते प्रचारात असल्याने बोलू शकत नाहीत, असे उत्तर त्यांच्या स्वीय सहायकाने दिले. 

ही तर नागरिकांची चेष्टा! 
या कार्यालयाच्या उद्‌घाटनाची बातमी वाचून अनेक नागरिक टपाल कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र, तेथे पारपत्र कार्यालय सुरूच नसल्याचे समजल्यानंतर ते संताप व्यक्त करतात. पदे आणि कर्मचारी मंजूर नसताना शिवसेनेने पारपत्र कार्यालयाचे उद्‌घाटन करत नागरिकांची चेष्टाच केली, अशी प्रतिक्रया आर. एन. घोले या वृद्ध महिलेने दिली. 

Web Title: karun dakhavla shivsena