Dombivali News : केडीएमसीला मिळणार दिलासा! कल्याण लोकसभा क्षेत्रातील पाणी समस्येवर महत्वपूर्ण बैठक

कल्याण-डोंबिवली,बदलापूर, अंबरनाथ या भागातील नागरिकांना पाण्याची समस्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भेडसावू लागली आहे.
Uday Samant
Uday SamantSakal

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली,बदलापूर, अंबरनाथ या भागातील नागरिकांना पाण्याची समस्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भेडसावू लागली आहे. याप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिका प्रशासन व एमआयडीसीने संयुक्तरित्या काम करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. पाण्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, बालाजी किणीकर, महेंद्र दळवी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड, एमआयडीसीचे सीईओ बिपिन कुमार शर्मा तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या परिसरातील जनतेला कायमस्वरूपी मुबलक प्रमाणात पाणी देण्याच्या दृष्टीने महापालिका व एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी अधिक प्रभावी उपाययोजना करावी असे निर्देश या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. महापालिका प्रशासन म्हणून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद केले. तसेच आणखी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील जनतेसाठी दिवाळीच्या काळात पाण्याचं जे प्रेशर ठेवण्यात येतं, तेच प्रेशर सध्या मेंटेन करावं. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील जनतेला करण्यात येणारा पाणीपुरवठा दहा एमएलडीने वाढवावा. तसेच या भागातील पाणीपुरवठा कशा पद्धतीने सुरळीत होऊ शकेल, या दृष्टीने येत्या दोन महिन्यांमध्ये एमआयडीसीने आपला डीपीआर तयार करावा असे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.

बैठकीत महत्वाचे निर्णय....

- उल्हासनगर शहरातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 10 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यात येणार.

- उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने दोन महिन्यात डीपीआर तयार करावा. यामध्ये बांधा, वापरा हस्तांतरित करा तत्त्वावर, तृतीय स्तरावर पाणी प्रक्रिया करणे ( BOT - Tertiary water project ) याचा एका महिन्यात सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.

- पलावा लोढा गृह संकुलात राहणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी व्यवसायिक दर लागू करण्याऐवजी निवासी दर लागू करण्यात येणार आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेने कार्यवाही करावी.

- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी एमआयडीसी एक ठरावीक रक्कम आकारते. ही रक्कम गेल्या काही वर्षात 60 कोटी इतकी होती. मात्र ही रक्कम पालिकेने न भरल्याने त्यावर तब्बल 230 कोटींची व्याजाची रक्कम झाली होती. ही व्याजाची रक्कम पूर्ण माफ करण्यात आली.

- तर 60 कोटी रुपये येत्या पाच ते सहा वर्षात प्रशासनाला टप्प्याटप्प्याने भरावे लागणार आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

- याच बरोबर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात मागील काही महिन्यात अधिक दाबाने पाणी येत होते. मात्र आता सध्या कमी झाले आहे. याबाबत अत्यंत तातडीने निर्णय घेऊन संपूर्ण दाबाने पाणी सोडण्यात यावे.

- यांसह सर्व शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनाने संयुक्तरीत्या काम करावे. अशा सर्व सूचना आणि निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com