esakal | KDMC : ‘टोल फ्री’वर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस | Road Potholes
sakal

बोलून बातमी शोधा

kdmc

KDMC : ‘टोल फ्री’वर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्यावरील खड्डे (Road Potholes) असोत किंवा इतर नागरी समस्या (civic problems), कल्याण-डोंबिवलीकरांनी आता पालिका प्रशासनाला (KDMC Authorities) जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांवरून समाज माध्यमावर (social media) प्रशासनाला ट्रोल केल्याने उशिरा का होईना पालिकेला जाग आली. त्यानुसार खड्ड्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी (people complaints) जाणून घेण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक (toll free number) पालिकेने जारी केला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यास सुरुवात केली असून, दिवसाला १५च्या आसपास तक्रारी या क्रमांकावर नोंदविल्या जात आहेत. या तक्रारींचे निवारण होते, की केवळ तक्रारी दाखल केल्या जातात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाने उघडीप देताच खडी टाकून हे खड्डे बुजविण्यात आले; परंतु मुसळधार पावसामुळे पुन्हा खड्डे पडल्याने या समस्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्षांनी आंदोलने केली. याबाबत मिम्स, व्हिडीओ बनविले गेले तरी पालिका प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने अखेर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाचे हत्यार उपसले. नागरिकांचा हा संताप समाजमाध्यमातून दिसून येताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर कमी होताच पालिकेने खड्डे भरण्याचे व रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार नोंदविण्याकरिता १८०० २३३ ००४५ या टोल फ्री क्रमांकाची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी केले आहे.८ ऑक्टोबरला हा टोल फ्री क्रमांक पालिका प्रशासनाने जारी केला.

हा क्रमांक जाहीर करून ८ दिवस उलटले असून दिवसाला १५च्या आसपास तक्रारी नोंदविल्या जात आहेत. आतापर्यंत जवळपास १०० च्या आसपास खड्ड्यांविषयीच्या तक्रारी नागरिकांनी या क्रमांकावर नोंदविल्या आहेत. नागरिकांकडून त्यांची तक्रार, खड्डा कुठे आहे, याचा पत्ता घेतला जातो. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी या नोंदविलेल्या तक्रारी घेऊन जातात व त्या सोडवण्याचे प्रयत्न करतात. आतापर्यंत किती तक्रारींचे निवारण झाले, याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.

loading image
go to top