अंबरनाथमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला; चारही हल्लेखोर अर्ध्या तासांत जेरबंद 

श्रीकांत खाडे/दिनेश गोगी
Saturday, 24 October 2020

अंबरनाथमध्ये पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) मध्यरात्री घडली. हल्ला करून पसार झालेल्या चार जणांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक करण्यात यश मिळवले. दिलखुष प्रतापसिंग (19), अंकुश प्रतापसिंग (22), युवराज पवार आणि अबिद अहमद शेख (सर्व राहणार उल्हासनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आज त्यांना उल्हासनगरातील चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अंबरनाथ/उल्हासनगर : अंबरनाथमध्ये पोलिस हवालदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) मध्यरात्री घडली. हल्ला करून पसार झालेल्या चार जणांना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक करण्यात यश मिळवले. दिलखुष प्रतापसिंग (19), अंकुश प्रतापसिंग (22), युवराज पवार आणि अबिद अहमद शेख (सर्व राहणार उल्हासनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आज त्यांना उल्हासनगरातील चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना 28 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

क्लिक करा : मुंबई पोलिसांच्या कॉलरवर हात ! कारवाई केली म्हणून ट्राफिक हवालदाराला महिलेकडून मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उपशहरप्रमुख कैलास तेजी यांचे जनसंपर्क कार्यालय उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये असून शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी 7 नंतर हातात तलवारी व कोयता घेऊन आलेल्या दिलखूष व इतरांनी तेजी यांच्या कार्यालयाचे शटर व बोर्डची तसेच कॅम्प 4 मध्ये केबल व्यावसायिक गंगाधर भोसले यांच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर हे तरुण एका कारमधून फॉरवर्ड लाईन येथून सुसाट अंबरनाथच्या दिशेने निघाले.

त्याचवेळी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार बाळू चव्हाण उल्हासनगरच्या फॉरवर्ड लाईन परिसरातून बदलापूरला घरी जाण्यासाठी उभे होते. चव्हाण यांना या चौघांचा संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून चौघांना लक्ष्मी नारायण चित्रपट गृहासमोर अडवले. या तरुणांनी अचानक चव्हाण यांच्यावर तलवार कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले व कार सोडून रिक्षाने पुन्हा उल्हासनगरच्या दिशेने पळ काढला. 

अधिक वाचा : यंदा आव्वाsssज नाही! ना गर्दी, ना घोषणा शिवसेनेचा दसरा मेळावा मंत्री नेत्यांच्या उपस्थितीत

अंबरनाथचे सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे व इतर अधिकाऱ्यांनी जखमी झालेले बाळू चव्हाण यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. चव्हाण यांच्यावर हल्ला करणारे तरुण उल्हासनगरच्या दिशेने आल्याचे समजताच सहायक पोलिस आयुक्त डी. डी. टेळे, विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे, मध्यवर्ती ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अस्लम खतीब, विठ्ठलवाडीचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत, सचिन साळवे, कॉन्स्टेबल समीर गायकवाड यांनी नाकाबंदी केली.

त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिलखूष, अंकुश या दोन भावांसह युवराज पवार, अबिद शेख यांना अटक केली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपींवर यापूर्वी विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four criminals attacked the police with swords In Ambernath