केईएमचे मेडिसीन युनिट धोक्‍याच्या गर्तेत 

नेत्वा धुरी
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने तातडीने हालचाली करून संध्याकाळीच हा साठा हलविण्यास सुरुवात केली. 
रुग्णालयाच्या काही जिन्यांवरही औषधांचा साठा ठेवला होता.

मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने तातडीने हालचाली करून संध्याकाळीच हा साठा हलविण्यास सुरुवात केली. 
रुग्णालयाच्या काही जिन्यांवरही औषधांचा साठा ठेवला होता.

अग्निशमन दलाच्या नियमांनुसार जिन्यांवर अडथळे ठेवण्यास मनाई आहे. कमला मिलमध्येही अशाच प्रकारे जिन्यांवर मोठमोठे सामान ठेऊन जिना बंद केला होता. अशा स्थितीत तेथे लागलेल्या आगीत अनेकांना पळता न आल्याने मरण आले होते. केईएममध्येही अशीच दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा प्रश्‍न रुग्ण विचारत होते. संध्याकाळी प्रशासनाने हा सर्व साठा हलविण्यास सुरुवात केली असली, तरीही असा हलगर्जीपणा पुन्हा झाल्यास दुर्घटना होण्याची भीती आहे. औषधे व रसायनांचा मोठा साठा असलेल्या या पाच मजली इमारतीत क्षुल्लक कारणामुळे कधीही आगीचा भडका उडेल, असे भयावह चित्र आहे.

रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 1 जवळ मेडिसीन युनिट उभारण्यात आले आहे. हे बांधकाम अंदाजे 30 वर्षे जुने आहे. आग लागल्यास इथे कुठेही आग विझवण्याची व्यवस्था नाही. जागेच्या अनुपलब्धतेमुळे औषधांचा साठा जिन्यावरच बाजूला ठेवलेला होता. या इमारतीतील लिफ्ट्‌स कित्येकदा बंदच राहतात. या विभागात राजीव गांधी योजनेच्या रुग्णाचे नातेवाईकही मोठ्या संख्येने येत असतात. येथे मोठी गर्दी असल्याने आग लागल्यास येथील कर्मचाऱ्यांना, रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेर येण्यासाठी जागाही मिळणार नाही. या इमारतीच्या बाजूलाच नवजात शिशूंचा वॉर्ड क्रमांक 1, त्वचारोग व मानसोपचार विभाग आहे. त्यामुळे आगीत मोठी जीवितहानी होण्याचीही शक्‍यता आहे. 

मेडिसीन युनिटमधील त्रुटी - 
- ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने औषधांचा साठा खराब होण्याची भीती 
-दोन लिफ्टपैकी एक लिफ्ट कित्येक वर्षे बंद आहे, तर दुसरी आठवड्यातून एकदाच उपलब्ध असते 
-आग विझवण्याचे यंत्र उपलब्ध नाही. टेकू उभारण्यासाठीही जागा नसल्याने संपूर्ण इमारत कधीही कोसळू शकते. 

काय आहे मेडिसीन युनिट? 
मेडिसीन युनिटमध्ये औषधे, इंजेक्‍शन्स, क्रीम्स आणि रसायनांचा साठा आहे. 

पाच मजली इमारतीची रचना 
पहिला मजला - औषध विभाग 
दुसरा मजला - जनरल स्टोअर 
तिसरा मजला - जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या 
चौथा मजला - स्टिचर, शस्त्रक्रियेच्यावेळी उपयोगी असणारे धागे 
पाचवा मजला - साधनसामग्री 
एकूण जागा - 18 हजार चौरस फूट 

केईएमच्या मेडिसीन युनिटमध्ये जागेची कमतरता आहे. पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने जास्त औषधेही मागवली आहेत आणि जागा नसल्याने ती जिन्यावर ठेवली होती. बाथरूममध्येही रसायने होती; मात्र या दोन्ही बाबी आता दुसरीकडे सुरक्षित जागी हलविण्यात आल्या आहेत. जागेच्या टंचाईवर मात करण्यासाठी येथे 20 मजली नवी इमारत उभारण्याचाही प्रस्ताव आहे. 
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय 

Web Title: KEM's Medicines Unit Causes Danger