स्वप्नपूर्ती पडणार महागात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

नवी मुंबई - खारघर येथे सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील प्रतीक्षा यादीतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अडीच वर्षाच्या प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना दिलेल्या घरांच्या किमतीत सिडकोने तब्बल सात ते दहा लाखांची भरमसाठ वाढ केल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचा पहिला हप्ता भरण्यासाठी केवळ महिन्याची मुदत दिली असल्याने ते नाराज झाले आहेत.

२०१४ च्या सुमारास सिडकोने खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील सुमारे तीन हजार ३३४ घरांच्या विक्रीसाठी सोडत काढली होती. त्यातील यशस्वी ग्राहकांना सिडकोने अल्प उत्पन्न गटातील ३७० चौरस फुटांची घरे २४ लाखांना, तर अल्प उत्पन्न गटातील ३१० चौरस फुटांच्या घरासाठी १५ लाख इतकी किंमत ठेवली होती. तीच घरे आता २२ ते ३४ लाखांवर गेली आहेत.

शेवटी भुर्दंड ग्राहकांनाच
सिडकोच्या घरांची संगणकीय पद्धतीने सोडत जाहीर झाल्यानंतर यशस्वी ग्राहकांची कागदपत्रे छाननी, कर्जाचे हप्ते, यशस्वी ग्राहकांसोबत करार, अयशस्वी ग्राहकांना मुदतवाढ या सर्व कामांमध्ये सिडकोलाच दोन ते अडीच वर्षांचा काळ लागला. नंतर प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी दिल्याने त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांची छाननी व अनामत रक्कम घेतल्यानंतर पुन्हा त्यासाठी सिडकोला दीड वर्ष लागले. त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना बसला आहे.

सिडकोने घराचे आकारलेले दर हे चालू बाजारभावाप्रमाणे आहेत. घराचे वाटपपत्र ग्राहकांना ज्या चालू आर्थिक वर्षात मिळतील त्याच वर्षातील बाजारभावाप्रमाणे घरांचे दर आकारण्यात आले आहेत. 
- मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Kharghar home project built by CIDCO

टॅग्स