खारघर,कामोठे भुयारी मार्ग लवकरच

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

निविदा प्रक्रिया सुरू; पावसाळ्यानंतर सुरुवात

मुंबई: कामोठे आणि खारघर हिरानंदानी उड्डाणपुलाखालील प्रलंबित भुयारी मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली. 

शीव- पनवेल महामार्गावरील कामोठे आणि खारघर येथील पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडता यावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्ग उभारण्याचे काम हाती घेतले होते; मात्र काही कारणास्तव हे काम अपूर्णच राहिले. नुकतेच खारघरमधील शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रकांत देवरे यांनी खारघर येथील भुयारी मार्ग आणि हिरानंदानी पुलाखाली बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन दिले होते. 
भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यामुळे डासांमुळे वाहतूक पोलिसांनाही त्रास होत असल्याचे वाहतूक विभागाने पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. 

नागरिकांचा वाढता दबाव लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्ग विकसित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून पावसाळ्यानंतर या दोन्ही भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kharghar, kamothe subway soon