खारघरमध्ये अनियोजनाचा ‘तळ’

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पार्किंगसाठी कसरत; जागा उपलब्ध नसल्याचा सिडकोचा अहवाल

मुंबई : खारघर रेल्वे स्थानकातील वाहनतळात वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे वाहन कुठे उभे करावे, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. स्थानकावर दुसरीकडे जागाच नसल्याचा अहवाल सिडकोच्या नियोजन विभागाने दिल्यामुळे स्थानकावरील वाहनतळाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून सिडकोच्या नियोजनाने ‘तळ’ गाठला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

पनवेल, नवीन पनवेल आणि खारघरच्या लोकसंख्येत भर पडल्यावर शासनाने ९ वर्षांपूर्वी पनवेल-सीएसटी रेल्वे सुरू केली. सिडकोने रेल्वे स्थानकाच्या छतावर वाहनतळ उभारलेले खारघर हे राज्यातील पहिले स्थानक आहे. छतावर चारशे चारचाकी आणि चार हजार दुचाकी वाहने उभी करता येतील असे नियोजन सिडकोने करून छतावर वाहनतळ उभारले; मात्र गेल्या पाच वर्षांत खारघरच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.  

वाहने उभी करण्यासाठी जागाच नसल्यामुळे काही प्रवासी सरकत्या जिन्याशेजारी; तर काही पदपथावर, रस्त्याच्या कडेला तसेच रिक्षा स्टॅंडच्या जागी वाहने उभी करून नोकरी व कामावर जातात. परिणामी खारघर स्थानकावर वाहने उभी करण्याचा प्रश्‍न गंभीर होत असून सिडको आणि रेल्वे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

बेलपाडा भुयारी मार्गासमोर असलेल्या रेल्वेच्या प्रवेशद्वाराशेजारी सिडकोने रिक्षा स्टॅंडसाठी लेन तयार केली आहे; मात्र प्रवासी या जागेत दुचाकी वाहने उभी करून पसार होतात. त्यामुळे रिक्षाचालकांना रिक्षा काढताना खूप त्रास होतो.
- एकनाथ ठाकूर, रिक्षा चालक

खारघर वाहनतळावर वाहने पार्किंगच्या जागेसंदर्भात नियोजन विभागाकडे विचारणा केली असता स्थानक परिसरात जागाच उपलब्ध नसल्याचे सांगितले. सध्या वाहने उभी करण्यासाठी जागा नाही; मात्र पुढील वर्षी बेलापूर-पेंधर मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाल्यास खारघर स्थानकावर उभी केली जाणारी वाहने निम्म्याहून अधिक कमी होतील.
- सोमा विजयकुमार, 
मुख्य परिवहन आणि नियोजनकार, सिडको

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kharghar parking area