खोपोलीत "तिसरा डोळा' निष्क्रीय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी या कामी सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठी मदत झाल्याचे सांगितले. सीसीटीव्ही दुरुस्त होण्यासाठी खालापूर व खोपोली विभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजित पाटील आग्रही आहेत.

खोपोलीः शहरातील गुन्हेगारी रोखण्याचे व विविध गुन्हे करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यासाठी येथील सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत; मात्र वेळेवर डागडुजी व दुरुस्ती होत नसल्याने अनेक सीसीटीव्ही निष्क्रीय झाल्याचे चित्र आहे.

पोलिसाच्या हत्येप्रकरणी तरुणास जन्मठेप
 
खोपोली पोलिसांना सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणे शक्‍य झाले. मागील पंधरा दिवसांत तीन चोऱ्या व मोबाईल चोरणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी यशस्वीपणे तपास करून जेरबंद केले. यापूर्वीही अनेक गुन्हेगारी प्रकरणांत खोपोली पोलिसांनी यशस्वी तपास करून आरोपींना शिक्षा देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी या कामी सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठी मदत झाल्याचे सांगितले. सीसीटीव्ही दुरुस्त होण्यासाठी खालापूर व खोपोली विभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजित पाटील आग्रही आहेत.
 
शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, अतिवर्दळीच्या चौकात, महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी, एसटी बस, सिटीबस स्थानके, हॉस्पिटल अशा सर्व ठिकाणी पालिका व खोपोली पोलिस यांच्या एकत्रित सहभागाने सीसीटीव्ही बसविले आहेत; मात्र वेळोवेळी डागडुजी व दुरुस्ती होत नसल्याने यातील अनेक सीसीटीव्ही सुस्थितीत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. यासाठी पालिकेकडून निधी मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे. 

सीसीटीव्ही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे कार्य करीत आहेत; मात्र अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही काम करीत नाहीत. शहरातील रस्ते व प्रमुख चौकात सीसीटीव्ही लावण्याचे काम अद्याप झाले नाही. त्याही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची आवश्‍यकता आहे. 
- मनोज माने, सामाजिक कार्यकर्ता, खोपोली 

खोपोली शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही पालिकेने तत्काळ सुरू करावेत. शहरातील अन्य भागांतही सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. 
- गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली 

पालिकेकडून सीसीटीव्ही देखभाल व दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. पोलिस विभाग व पालिका प्रशासन यांच्या समन्वयाने भविष्यात लागणाऱ्या निधीची पूर्तता करण्यात येईल. 
- सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khopoli-cctv-problem