खोपोली एक्‍झिट, अंडा पॉईंट जीवघेणे 

खोपोली : एक्‍झिट आणि अंडा पॉईंट अपघातांचे केंद्र आहे. 
खोपोली : एक्‍झिट आणि अंडा पॉईंट अपघातांचे केंद्र आहे. 

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरील खंडाळा घाटात विशेषतः दस्तुरी वळण रस्ता, खोपोली एक्‍झिट आणि अंडा पॉईंट येथे वारंवार अपघात होत आहेत. या संदर्भात प्रशासनाने वारंवार सुरक्षेबाबत निर्देश दिले होते. त्यानंतरही बेकायदा वाहतुकीचे ग्रहण कायम असून त्याचाच परिणमा म्हणून गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या अपघातात 16 जणांना प्राणास मुकावे लागले आहे.

बोरघाटात रविवारी उशिरा रात्री झालेल्या अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी एका अपघातात कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या सचिवांचा मृत्यू झाला. प्रतिबंध असलेल्या मार्गावरून नियमबाह्य वाहतूक आणि विशेषतः अवजड वाहतूक सुरूच असल्याने अपघातांना ते आमंत्रण ठरत आहे. 

खंडाळा घाटरस्त्यातील अमृतांजन ब्रिजखालील वळणरस्ता, दस्तुरी उतार, खोपोली एक्‍झिट वळण रस्ता आणि अंडा पॉईंट ही सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्रे आहेत. त्यातही खोपोली एक्‍झिट आणि अंडा पॉईंट या ठिकाणी सर्वाधिक अपघात होऊन अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. सहा महिन्यांत या दोन्ही ठिकाणी घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेत 16 जणांचा बळी गेला आहे.

यंदा जानेवारीत लागोपाठ घडलेल्या भीषण अपघातांच्या घटनांनंतर रायगड जिल्हाधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांनी येथील वाहतूक व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविलेल्या होत्या. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिस आणि खंडाळा घाट वाहतूक पोलिसांनी येथील अवजड वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीबाबत निरनिराळे निर्बंध लावले. यात अवजड वाहनांना खोपोली एक्‍झिट रस्त्यावरून उतरण्यास बंदी, मोठ्या वाहनांना द्रुतगती मार्गानेच खालापूर टोल नाक्‍यावरून जाण्याचा पर्याय मिळत होता; तर दस्तुरी-खोपोली रस्ता अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे सायमाळ मार्गे खोपोलीकडे येणाऱ्या महामार्गावरील उलट दिशेने होणारी वाहतूक बंद होऊन अपघातांची संख्या काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र रस्ते सुरक्षा अभियानानंतर काही दिवसांतच हे सगळे नियम शिथिल झाले असावेत, असे दिसते. त्यामुळे पुन्हा पूर्वीचीच स्थिती आहे. नियमबाह्य वाहतूक सुरू झाली असून अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. 

रविवारी रात्री घडलेला अपघात त्याचेच एक उदाहरण आहे. लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणांवर उलट दिशेने येणारा अवजड ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. एवढ्या मोठ्या घटनेनंतर येथील नियमबाह्य वाहतूक थांबण्याची अपेक्षा होती. मात्र यंत्रणेकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळेच मंगळवारी पहाटे पुन्हा खोपोली एक्‍झिट आणि अंडा पॉईंटदरम्यान अवजड ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन यात मंत्री हसन मुश्रीफ यांचे जवळचे सहकारी आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सचिव रणबीर चव्हाण यांचा जागेवर मृत्यू झाला; तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. 

खोपोली पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक श्रीरंग किसवे आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाढत्या अपघातांबाबत, खंडाळा घाटात वाहतूक नियम अधिक कडक करून प्रतिबंध असलेल्या रस्त्यांवरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची आवश्‍यकता असल्याचे नमूद केले. 

याबाबत खंडाळा घाट विभागाचे वाहतूक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी आणि पनवेल उपविभागीय वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याशी संपर्क झाला नाही. 

खोपोली एक्‍झिट आणि अंडा पॉईंट येथील अपघातांची संख्या कमालीची वाढली आहे. या ठिकाणी अवजड वाहतुकीवर निर्बंध आहेत. उलट दिशेने अवजड आणि प्रवासी वाहतुकीसाठी बंदी आहे. तरीही हे नियम तोडण्यात येतात. दुसरीकडे वाहतूक पोलिस यंत्रणा मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 
- गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते, खोपोली 

बोरघाटातील अपघातांच्या वाढलेल्या घटनांना वाहतूक पोलिस आणि खंडाळा घाटवाहतूक पोलिसांची निष्क्रियता जबाबदार आहे. अवजड वाहतुकीस बंदी असूनही खोपोली एक्‍झिट आणि अंडा पॉईंट, दस्तुरी वळण नियम येथे तोडण्यात येतात. 
- अमोल बांदल-पाटील, खोपोली 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com