खोपोली-कर्जत मार्ग असुरक्षित! रस्त्यांवर दिशादर्शक फलक बसवण्याची नागरिकांची मागणी

अनिल पाटील
Friday, 20 November 2020

खोपोली-कर्जत रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, येथे दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे.

खोपोली : खोपोली-कर्जत रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, येथे दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. बुधवारी रात्री असाच अपघात झाल्याने एकाला आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे या रस्त्यांवर दिशादर्शक फलक बसवण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे. 

हेही वाचा - मुंबईतील शाळा बंद, मात्र सोमवारपासून ठाण्यातल्या शाळांची वाजणार पहिली घंटा

हाळफाटा-पळसदरीमार्गे खोपोली-कर्जत रस्त्यांचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. या मार्गावर अद्याप दिशादर्शक फलके व सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे रस्त्यावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. कर्जत-खोपोली मार्गावरील डोळवली येथील झोराबियन कंपनीजवळील नदीच्या पुलाजवळ अशाच प्रकारे अर्धवट स्थितीत रस्ता आहे. ज्याचा अंदाज रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना लागत नसल्याने गाडी अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. अशीच घटना बुधवारी रात्री घडल्याने एका कारचालकालाचा बळी गेला आहे. या अपघातानंतर या रस्त्यांचे राहिलेले काम तातडीने करण्यासाठी आणि रस्त्यावर सुरक्षा व दिशादर्शक फलके बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरे- अतुल भातखळकर लढतीत, मनसे गेमचेंजर ठरण्याची शक्यता?

या संदर्भात खालापूर प्रेस क्‍लब, खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेसह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी ही मागणी एमएमआरडीए व संबंधित ठेकेदार कंपनी यांच्याकडे केली आहे. याबाबत लेखी निवेदन तालुका प्रशासन व एमएमआरडीए प्रकल्प अधिकाऱ्यांनाही देण्यात येणार असल्याचे प्रशांत गोपाळे, भाई ओव्हाळ यांनी सांगितले. 

Khopoli Karjat route unsafe Citizens demand installation of directional signs on roads

-------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khopoli Karjat route unsafe Citizens demand installation of directional signs on roads