
किरीट सोमय्यांच्या लव्हस्टोरीमागे इंदिरा गांधींच्या आणीबाणीचे कनेक्शन आहे
महाराष्ट्रात राजकारणाच्या बातम्या बघितल्या की काही नाव रोज चर्चेत हमखास आढळतात. यात एक नाव प्रमुख असते ते म्हणजे किरीट सोमय्या. कधी आपल्या वक्तव्यांमुळे तर कधी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे सोमय्या यांना भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही दिवसात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला चांगलंच घेरलेलं आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत देखील तोडीस तोड प्रकरणे बाहेर काढताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत साठी जमवलेल्या निधीवरून आरोपांची फैरी झाडली होती. आता ते किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेधा किरीट यांच्यावर टॉयलेट घोटाळ्यावरून आरोप करत आहेत. मध्यंतरी त्यांनी जाहीर केलं होतं,आयएनएस विक्रांत फाईल नंतर येत आहे टॉयलेट एक लव्ह स्टोरी..
आपल्या पत्नीला राजकीय वादात ओढल्यामुळे किरीट सोमय्या यांनी देखील संजय राऊत यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. त्यांच्या पत्नी मेधा किरीट या एक सामाजिक कार्यकर्त्या व पूर्वाश्रमीच्या शिक्षिका आहेत. सध्या जरी त्या राजकारणापासून दूर असल्या तरी त्यांची लव्हस्टोरी मात्र पक्की राजकीय आहे.
मुलुंडच्या नीलम नगरमध्ये राहणारे किरीट सोमय्या यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1954 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयंतीलाल तर आईचे नाव गुणवंती. गांधीवादी विचारांचं हे घराणं. किरीट यांच्या आईला आपल्या मुलाने देशसेवेसाठी वाहून घ्यावं असा ध्यास होता. किरीट हे गणितात प्रचंड हुशार होते. घरातील वातावरणामुळे अगदी लहानपणीच त्यांची राजकारणाशी ओळख झाली. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पेटून उठण्याचे संस्कार आईवडिलांच्या गांधीवादामुळेच मिळाले.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी संपत्ती दडवली; किरीट सोमय्यांची आयकर विभागाकडे तक्रार
दुसरीकडे मेधा सोमय्या यांचं घराणं मात्र अगदी संघांच्या विचारांचं. रायगड जिल्ह्यातील चौल येथे डॉ.ओक यांच्या घरात मेधा यांचा जन्म झाला. संघात काम करत असल्यामुळे ओक कुटुंब राजकारणाशी थेट संबंधित होतं. मेधा यांच्या वडिलांनी, आईने, काकांनी या सर्वांनी निवडणुका लढवल्या होत्या. मेधा यांना सुद्धा राजकारणाची आवड होती. वयाच्या अगदी तिसऱ्या वर्षांपासून काकांच्या प्रचारसभेत भाषणे केल्याच्या आठवणी त्या सांगतात. राजकारणाची त्यांना आवड होती. लग्न केलं तर राजकारण्याशीच करायचं हे त्यांनी खूप आधीच ठरवलं होतं.
आणीबाणीत फुलली लव्हस्टोरी
सालं होतं १९७५. मेधा किरीट या शिक्षणासाठी मुंबईत आपल्या काकांकडे आल्या होत्या. या काळात इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यांच्या हुकूमशाही विरोधात जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन पुकारलं होतं. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी या चळवळीत उडी घेतली होती. मेधा तेव्हा बीएस्सी फर्स्ट इयरला होत्या. अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना नॅशनल लेव्हलची स्कॉलरशिप मिळाली होती. मात्र तरीही मेधा यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आणिबाणीविरोधातील चळवळीत उतरल्या. त्या राहायच्या अंधेरी मध्ये तर किरीट सोमय्या हे वांद्रे इथे राहायचे. चळवळीसाठी मुकुंदराव कुलकर्णी पुष्पाताई वागळे यांनी पश्चिम मुंबईत घेतलेल्या बैठकांना ते दोघेही उपस्थित असायचे. तिथे त्यांची ओळख झाली. या ओळखीचं हळूहळू मैत्रीत आणि पुढे प्रेमात रूपांतर झालं.
हेही वाचा: किरीट सोमय्यांची सहकुटुंब पोलिसांत धाव; संजय राऊतांविरोधात तक्रार करणार
किरीट सोमय्या सांगतात, मी आधीपासूनच ठरवलेलं कि गुजराती परिवारा ऐवजी एखाद्या मराठी मुलीशीच लग्न करायचं. एक तर या मुली नोकरी करायला तयार असतात. नवऱ्याने खूप पैसे मिळवावेत अशी त्यांची काही अपेक्षा नसते. अशीच मुलगी मला मेधा मध्ये दिसली. स्वतः चळवळीत काम करत असल्यामुळे, संघ विचारांची पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही दोघेही एकत्र देशसेवेला वाहून घेऊ शकत होतो.
दोघे एकत्र काम करू लागले. आंदोलनामुळे सोबतच आर्थर रोड जेलमध्ये गेले. तिथून बाहेर आल्यावर देखील पवई वगैरे भागात ते डेटिंगला जायचे. इंदिरा गांधींच्या विरोधातील आंदोलनातून त्यांचं प्रेम फुललं. पुढे लग्न देखील झालं. किरीट सोमय्या यांनी पूर्णवेळ राजकारण करायचं ठरवलं. मुंबईत जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जबाबदारी त्यांच्या कडे आली. पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर किरीट सोमय्या भाजपमध्ये आले. १९८५ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली.
पुढे किरीट सोमय्या राजकारणात भरारी मारत असताना मात्र मेधा किरीट यांनी मात्र बॅकसीटला राहणे पसंत केले. घर चालवण्यासाठी त्यांनी नोकरी केली. अनेक वर्षे त्या रुईया महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. मात्र जरी मेधा संसारात व्यस्त असल्या तरी राजकारणाशी त्यांचा संपर्क तुटला नाही. मुलांची व घराची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी किरीट सोमय्या यांना युवक प्रतिष्ठानच्या समाजकार्यात मदत करत खंबीर साथ दिली. फक्त इतकंच नाही तर देशपातळीवरील राजकीय नेत्यांच्या सहचारिणींचे पडद्याआड लपलेलं कर्तृत्व उलगडून दाखवणारे 'सखी सूत्र' तसेच माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे चरित्र असलेले 'ताई' अशी पुस्तके लिहून लेखिका म्हणून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे.
आज जरी किरीट सोमय्या व मेधा किरीट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असले तरी किरीट यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर मात्र कोणी बोट दाखवू शकलेलं नाही. आजही त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर एक लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी मंत्रीपद देखील भूषवले आहे. या त्यांच्या यशाचं सिक्रेट हे आणिबाणीवेळी सुरु झालेली राजकीय कारकीर्द आणि आर्थर रोड जेलमध्ये सुरु झालेल्या लव्हस्टोरीत लपलंय हे नक्की.
Web Title: Kirit Somaiyya And Medha Kirits Love Story Started During Indira Gandhis Emergency
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..