
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी आरक्षित झालं. यामुळे मुंबईचा महापौर कोण? याबाबत प्रचंड उत्सुकता होती.
दरम्यान, आता मातोश्रीच्या आदेशावरून आता मुंबई महापौर पदासाठी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक अँड. सुहास वाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त सचिवांकडे किशोरी पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच..
संख्याबळ नसल्याने आम्ही मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत. मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही. मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही!
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. गेले 20 वर्ष मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. दरम्यान महापौरपदासाठी इच्छुकांची यादी मोठी होती. यामध्ये समाधान सरवणकर, किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा होती.
Webtitle : kishori pednekar may become next mayor of mumbai