भयंकर! भिवंडीत ऑन ड्युटी असलेल्या पोलिसावर चाकूनं वार

पूजा विचारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

शनिवारी बकरी ईदच्या दिवशी एका पोलिसावर चाकूनं वार केल्याची घटना घडली आहे. 

मुंबईः भिवंडीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी बकरी ईदच्या दिवशी एका पोलिसावर चाकूनं वार केल्याची घटना घडली आहे. रात्री दोन जणांमध्ये झालेला वाद सोडवतानाच या पोलिसावर वार केल्याचा भयंकर प्रकार घडला. भिवंडी शहरातल्या टावरे कंपाऊंड येथे ही घटना घडली. 

याठिकाणी रात्री दोन जणांमध्ये वाद झाला. ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसानं या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी अरेरावीची भाषा केली आणि पोलिसावरच धारदार शस्त्रानं वार केले. या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

हेही वाचाः शरद पवारांकडून टोपे यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन, शेअर केली भावूक पोस्ट

आरोपीनं पोलिसाच्या हातावर, पाठीवर चाकून सपासप वार केले आणि घटनास्थळावरुन तरुणानं पळ काढला. भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीवर असलेल्या पोलिसानं त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. जखमी झालेल्या पोलिसाला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. या जखमी पोलिसाचं नाव प्रफुल्ल दळवी असून त्यांचं वय ५२ आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

अधिक वाचाः  मुंबईकरांची यशाच्या दिशेनं वाटचाल, धारावीत उरले केवळ इतकेच अॅक्टिव्ह रुग्ण

दरम्यान भिवंडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

Knife attack Policeman duty stabbed in bhiwandi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack Policeman duty stabbed in bhiwandi