शरद पवारांकडून टोपे यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन, शेअर केली भावूक पोस्ट

पूजा विचारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राजेश टोपे यांच्या आईच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत भावूक पोस्ट लिहिली आहे. 

मुंबईः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षांच्या होत्या. राजेश टोपे यांच्या आईच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत भावूक पोस्ट लिहिली आहे. 

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो' अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

माझे दिवंगत सहकारी आणि मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सुपुत्र राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली.

माझे कुटुंबीय आणि पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

सुप्रिया सुळे यांच्याकडून टोपे यांचं सांत्वन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन टोपे यांचं सांत्वन केलं. सुप्रिया सुळे आणि संदानंद सुळे यांनी राजेश टोपे यांच्या मातोश्री यांच्या पार्थिंव दर्शन घेतले.

हेही वाचाः  मुंबईत पुन्हा धोका वाढतोय? सलग दोन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक

पहाटे 3 ते 4 च्या सुमारास शारदाताईंचं पार्थिव मुंबईतून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले. शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी 4 वाजता पाथरवाला ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणारेत.  कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

अधिक वाचाः  मुंबईकरांची यशाच्या दिशेनं वाटचाल, धारावीत उरले केवळ इतकेच अॅक्टिव्ह रुग्ण

राजेश टोपे यांच्या आईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मार्चमध्येही त्या महिनाभर ॲडमिट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

ncp sharad pawar share emtional post helath minister mother died


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp sharad pawar share emtional post helath minister mother died