esakal | कोपरी गाव वायुप्रदूषणाने त्रस्त? Kopari Thane
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोपरी गाव वायुप्रदूषणाने त्रस्त?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : काही महिन्यांपासून एमआयडीसी (MIDC) भागातील कंपन्यामधून रात्री-अपरात्री प्रदूषित वायू सोडले जात असल्याने कोपरी गाव सेक्टर २६ परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दुर्गंधीयुक्त रासायनिक वायूमुळे त्रास जाणवू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला (Maharashtra Pollution Control Board) वारंवार तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.

नवी मुंबईतील रबाळे, महापे व पावणे औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या रासायनिक कंपन्यांमधून सातत्याने रात्री-अपरात्री रसायनमिश्रित वायू हवेत सोडला जातो. याशिवाय, रसायनमिश्रित सांडपाणीही नाल्यांमधून सोडले जाते. त्यामुळे परिसरात प्रदूषण होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास होण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. कोरोनामुळे हा त्रास थेट रुग्णांच्या फुफ्फुसावर मारा करण्याची शक्यता असल्याने कोपरी गाव आणि परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. अशाच प्रकारे गुरुवारी (ता. २३) रात्री ११ च्या सुमारास प्रदूषित वायू सोडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे सर्वत्र धुक्याचे लोळ पसरले होते. या वायूमुळे कोपरी गाव व सेक्टर २६ मधील नागरिकांना, मळमळणे, डोके दुखणे आणि छाती भरणे असा त्रास जाणवू लागला होता. वारंवार होत असलेल्या अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुर्गंधीयुक्त वायू सोडणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: स्मशानभूमीत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणार

कोपरी गाव, सेक्टर २६, बोनकोडे, कोपरखैरणे आदी भागांत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात एमआयडीसीमधील कंपन्यांकडून प्रदूषित वायू सोडले जात आहे. याबाबत आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे १० महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा केला. तसेच विधिमंडळातही आवाज उठवून दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी केली. मात्र, त्‍यावर नियंत्रण ठेवण्यात नवी मुंबई पालिका, प्रदूषण मंडळ आणि शासन अपयशी ठरत असून प्रदूषित हवा सोडण्याचे सत्र सुरूच आहे.

हेही वाचा: मुंबई महापालिका निवडणुकीत नवा भिडू ; मतांचे गणित बिघडवणार

भोपाळ दुर्घटनेची पुनरावृती?

सहा महिन्यांपूर्वीही कोपरी गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होऊन उग्र वास आला होता. तेव्हा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व सोसायट्यामधील नागरिक घाबरून रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे भोपाळसारखी दुर्घटना या परिसरातही होऊ शकते, अशी भीती येथे रहिवाशांमध्ये पसरली आहे.

कोपरी गावातील नागरिकांना अधूनमधून रासायनिक वायूंचा त्रास होत असतो. त्याबाबत २०१४ मध्येही तक्रार केली होती. एका कंपनी व्यवस्थापनाला भेटून त्यांना समजही दिली; मात्र कालांतराने पुन्हा वायुप्रदूषण होतच आहे. त्यावर नियंत्रण राहत नाही.

- विलास भोईर, माजी नगरसेवक

कोपरी येथे घडलेल्या घटनेबाबत उशिरा माहिती मिळाली. त्याबाबत आढावा घेत आहोत. भविष्यात असा प्रकार न होण्याबाबत उचित कार्यवाही करू.

- जे. एन. कदम, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई

औद्योगिक कंपनीमधून होणाऱ्या वायुप्रदूषणाची झळ अधूनमधून बसत असते. नागरिकांना त्याचा त्रास होतो. लोकप्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण विभाग योग्य कार्यवाही करत नाहीत.

- तानाजी पवार, रहिवासी सेक्टर २६

loading image
go to top