उद्यापासून वाशी खाडीपूल दुरुस्तीसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

कोपरखैरणे - सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक ऐरोली खाडीपूलमार्गे वळवली आहे. हे काम मंगळवार (ता. 23)पासून सुरू होणार असून, ते 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या काळात मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल बंद राहणार आहे. याशिवाय उरण मार्गावरील उड्डाणपुलांच्या कामांमुळे उरण फाटा येथून जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक कळंबोली सर्कलमार्गे वळवण्यात आली आहे.

वाशी खाडीपुलावरील जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्यावर त्याचा ताण मुलुंड-ऐरोली खाडीपुलावर पडणार आहे. त्यातच उरण मार्गावरही सहा उड्डाण पुलांची कामे सुरू असल्याने त्या ठिकाणचीही वाहतूक वळवण्यात आली आहे. एकाच वेळी दोन महामार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्‍यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे.

दुरुस्तीचे काम आवश्‍यक असल्याने वाहतुकीबाबत हे निर्णय घेतले आहेत. कामामुळे शहरातील ठाणे-बेलापूर मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावर वाहतुकीचा ताण पडणार असून, वाहतूक नियंत्रणासाठी आम्ही सज्ज आहोत.
- नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग

Web Title: koparkhairane news vashi khadi bridge close for repairing