एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेले वर्वरा राव यांना नानावटीमध्ये दाखल करण्याचे आदेश

सुनीता महामुणकर
Wednesday, 18 November 2020

राव मागील दोन वर्षांपासून अटकेत आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुंबई, ता. 18 : एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या कवी वर्वरा राव यांना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. राव यांना पुढील पंधरा दिवस नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

८० वर्ष वय असलेले राव यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्याची आणि जामीन मंजूर करण्याची मागणी त्यांच्या कुंटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. या याचिकेवर आज न्या एस एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राव यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारने  करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच त्यांच्या कुंटुंबियांना भेटण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे. रुग्णालयात नियम पाळून ही भेट घेता येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी : खेळता खेळता ४ वर्षीय अफिफाचा तोल गेला आणि अन्सारी कुटुंबावर ओढवला दुःखांचा डोंगर

राव सध्या पूर्णपणे झोपून असतात, त्यांची प्रक्रुती खालावत आहे, त्यांना डायपर लावावा लागतो, त्यांच्याजवळ देखभाल करण्यासाठी कोणीतरी हवं, अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे वकिल इंदिरा जयसिंग यांनी खंडपीठापुढे सांगितले. जर राज्य सरकार त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नसेल तर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांना जेजे रूग्णालयात हलविण्यासही जयसिंग यांनी नकार दिला.

राव मागील दोन वर्षांपासून अटकेत आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत. वयोमानानुसार त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार आहेत. तसेच कोरोना संसर्गामध्येही त्यांच्यावर उपचार झाले आहेत. सध्या तळोजा कारागृहात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

महत्त्वाची बातमी :  मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत देणाऱ्या राजकीय पक्षाची माहिती देण्यास नकार

विशेष बाब म्हणून सहमती

राव यांना विशेष बाब म्हणून नानावटीमध्ये हलविण्यास सरकारकडून सहमती आहे, असे सरकारी वकील दिपक ठाकरे यांनी खंडपीठाला सांगितले. राव यांच्या प्रक्रुतीचे कारागृहातच काही बरेवाईट झाले तर अभियोग पक्षाला त्याचा काय उपयोग होणार, आणि जर ते निर्दोष सुटले तर कुंटुंबियांना काय मिळणार, असा भावनिक युक्तिवाद जयसिंग यांनी केला.

( संपादन - सुमित बागुल )

korgaon bhima elgar parishad court ordered to admit Varvara Rao to Nanavati hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: korgaon bhima elgar parishad court ordered to admit Varvara Rao to Nanavati hospital