'एल अँड टी'चे माजी संचालक वाय एम देवस्थळी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

एल अँड टी कंपनीचे माजी संचालक यशंवत मोरेश्वर (वाय एम) देवस्थळी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. 

मुंबई - एल अँड टी कंपनीचे माजी संचालक यशंवत मोरेश्वर (वाय एम) देवस्थळी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. देवस्थळी यांनी कंपनीत सुपरवायझर म्हणून सुरुवातीला काम करण्यास सुरुवात केली होती. 1974 साली ते कंपनीमध्ये रुजू झाले होते. 

देवस्थळी यांनी सिडनेहॅम कॉलेजमधून बीकॉम पूर्ण केलं. त्यानंतर सीए आणि एलएलबी दोन्ही एकाचवेळी केले. त्यानंतर एल अँड टी कंपनीमध्ये त्यांनी कामास सुरुवात केली. देवस्थळी यांना मुंबईतील फॅक्टरीमध्ये कामाचा अनुभव होता. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंगची त्यांना माहिती होती. त्यानंतर कोलकाता, दिल्लीमध्येही त्यांनी काम केलं. यात त्यांनी मार्केटिंग, सेल्स विभागाची जबाबदारी सांभाळली होती. 

1990 मध्ये देवस्थळी एल अँड टी कंपनीमध्ये महाव्यवस्थापक  बनले. त्यानंतर 1995 मध्ये 'एल अँड टी' समूहाचे पूर्णवेळ संचालक झाले होते. 2011 मध्ये ते निवृत्त झाले होते. यानंतर 'एल अँड टी फायनान्स होल्डींग'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते काम बघत होते. 2017 मध्ये त्यांनी  'एल अँड टी फायनान्स होल्डींग'मधून निवृत्त झाले होते. 

हे वाचा - रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील रुग्णसंख्येत घट; 66 टक्के बेड्स रिक्त

लार्सन अँड टुब्रो कंपनीची उलाढाल सध्या हजारो कोटींच्या घरात आहे. परदेशी तरुणांनी स्थापन केलेली ही भारतीय कंपनी आहे. 1938 मध्ये एल अँड टी ची स्थापना झाल्यानंतर 1950 मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. तेव्हा कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपये इतकी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: l and t former cfo ym deosthalee passes away