मुंबईचे आरोग्य संकटात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुंबई महापालिका रुग्णालयांत ४४ टक्केच डॉक्‍टर कार्यरत आहेत. रोजच वाढत चाललेल्या साथीच्या रोगांबरोबरच लेप्टो नि गॅस्ट्रोच्या रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे... 

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसानंतर साथीच्या आजारांचा जोर वाढू लागला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. मात्र, महापालिकेकडे तब्बल ४४ टक्के डॉक्‍टरांची कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषापेक्षा निम्मे डॉक्‍टरच महापालिका रुग्णालयांत कार्यरत आहेत. परिणामी सातत्याने रुग्णांचा राबता असलेल्या पालिका रुग्णालयांमधील आरोग्यच संकटात आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार एक लाख लोकसंख्येसाठी किमान १०० डॉक्‍टरांची आवश्‍यता आहे. मात्र, मुंबई शहरातील एक लाख नागरिकांसाठी महापालिकेत अवघे ५४ डॉक्‍टर कार्यरत आहेत. २६ टक्के परिचारिकांसह पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मुख्य रुग्णालयांबरोबरच दवाखाने आणि आरोग्य केंद्रांचीही अशीच अवस्था आहे.

केईएम रुग्णालय महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय. दरवर्षी तब्बल १८ लाख रुग्ण तिथे तपासले जातात. ८५ हजार रुग्ण दाखल असतात. एक रुग्ण किमान आठवडाभर रुग्णालयात दाखल असतो. रुग्णालयात १८०० खाटा असून प्रत्येक दिवसाला किमान दोन हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या ३९० आणि निवासी डॉक्‍टरांची संख्या ५५० आहे.
 

परिचारिकांची ३३७ पदे रिक्त
शीवमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात परिचारिकांची ८९४ पैकी ३३७ पदे रिक्त आहेत. शस्त्रक्रिया विभागातही २८ परिचारिकांची आवश्‍यकता आहे. मात्र, १४ परिचारिकाच उपलब्ध असतात. पालिकेच्या संपूर्ण वैद्यकीय विभागाच्या क्षमतेचा विचार केल्यास एका वेळी २० हजार रुग्णांवर उपचार करता येतील. मात्र, प्रत्यक्षात ३० ते ३५ हजार रुग्णांवर नियमित उपचार करावे लागतात. त्यातील ४० टक्के रुग्ण शहराबाहेरील असतात, अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्‍टरने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of doctors in municipal hospitals in Mumbai