तरुणीच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास; सायबर चोरट्यांचा शोध सुरु 

विक्रम गायकवाड
Saturday, 3 October 2020

सायबर गुन्हेगारांनी  एका तरुणीच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळवून तिच्या बँक खात्यातील तब्बल 4 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे.

नवी मुंबई (वार्ताहर) : सायबर गुन्हेगारांनी  एका तरुणीच्या बँक खात्याची सर्व माहिती मिळवून तिच्या बँक खात्यातील तब्बल 4 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर फसवणूकीसह आयटी ऍक्टनूसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

तक्रारदार तरुणी नादिरा निसार खान (26) हि नेरुळ सेक्टर-21 मध्ये आई-वडीलांसोबत राहते. 2015 मध्ये तिच्या वडीलांनी नेरुळ मधील स्टेट बँकेत तिच्या नावावर बचत खाते उघडले होते. त्यानंतर त्यांनी नादिराच्या लग्नासाठी या खात्यामध्ये थोडी-थोडी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नादिराच्या बचत खात्यामध्ये 5 लाख 3 हजार रुपये जमा झाले होते.
 

मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या जुलै महिन्यामध्ये सायबर गुन्हेगारांनी नादिराच्या बँक खात्याची व तिच्या बँकिंगच्या डिजिटल रेकॉर्डची संपुर्ण माहिती मिळवून ऑनलाईन इंटरनेट पद्धतीने खात्यातील तब्बल 4 लाख रुपये परस्पर काढून घेतले.  7 सप्टेंबर रोजी नादिराने एटीएम कार्डद्वारे 200 रुपये  काढल्यानंतर तिच्या बँकेत फक्त 1 लाख रुपयेच शिल्लक असल्याचे तिला समजले.  

बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास; दुर्लक्ष न करण्याचा सल्ला

त्यानंतर तिने वडील व भावासह स्टेट बँकेत जाऊन माहिती घेतली असता तिच्या बँक खात्यातून 15 जुलै ते 1 सफ्टेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत 4 लाख रुपये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काढून घेतल्याचे तिला सांगण्यात आले. विशेष म्हणजे नादिराच्या मोबाईलवर यातील एकाही व्यवहाराचा संदेश आला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नादिराच्या वडीलांनी लग्नासाठी पै-पै करुन जमा केलेली रक्कम सायबर चोरटयानी अशा पद्धतीने चोरल्याने नादिराच्या कुटुंबियांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

मुंबईत 24 फायर बाईक; अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवणार

 

(संपादन - अनिल जमधडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakhs of rupees looted from womans bank account in navi mumbai