बुलेट ट्रेनसाठी जमीन खरेदीचा श्रीगणेशा भिवंडीतून

दीपक हिरे 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

भाजप सरकारने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे . मात्र या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पास विरोध केला होता .

वज्रेश्वरी : मोदी सरकारचे बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाला असून बुलेट ट्रेनसाठी राज्यातील पहिल्या खरेदीखताची नोंदणी आज भिवंडीतील नोंदणी निबंधक कार्यालय 1 येथे झाली आहे. या खरेदीखत नोंदणी प्रसंगी भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड, भिवंडी 1 निबंधक कार्यालयाचे सह दुय्यम निबंधक एस. बी. तेलतुंबडे, रेल कॉर्पोरेशन ली. चे उप मुख्य प्रबंधक आदित्य भारद्वाज, प्रकल्प प्रबंधक अरुण नायक यांच्यासह जमीन मालक उपस्थित होते.

भाजप सरकारने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे . मात्र या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली असल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पास विरोध केला होता. त्यामुळे मागील वर्षभरापासून या प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद नसल्याने जमीन अधिग्रहणाच्या मार्गात अनेक अडथळे येत होते.

मात्र शासनाने बुलेट ट्रेनमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना भरघोस मोबदला दिल्याने शेतकरी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार झाले असल्याने बुलेट ट्रेन साठी भिवंडी तालुक्यातील मौजे पाये येथील सर्व्हे नं 42 /1 क्षेत्र 2. 18 गुंठे व सर्व्हे नं 41/1/2 क्षेत्र 27. 23 अशी जवळपास 29 गुंठे जमीन जमीन मालक रमेश मानिक गाला , मीनाक्षी गाला , मो. सलीम अब्दुल गफूर खान , रजीया बेगम सलीम खान यांच्या नावे असून या जमिनीसाठी तब्बल 3 कोटी 32 लाख 76 हजार468 एवढी रक्कम बुलेट ट्रेन प्रकल्पाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे . त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधीत झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचे नक्कीच " अच्छे दिन" आले आहेत यात मात्र शंका नाही.

Web Title: land acquisition for bullet train project in Bhiwandi