तुंगीकरांना दरडीचा धाेका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कर्जत तालुक्‍यात उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या तुंगी गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गावाजवळच असणाऱ्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. जमीन खचून दगड मातीचा भराव भातशेतीत आला आहे. त्यामुळे गावावर दरड कोसळण्याच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे.

मुंबई :  कर्जत तालुक्‍यात उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या तुंगी गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गावाजवळच असणाऱ्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. जमीन खचून दगड मातीचा भराव भातशेतीत आला आहे. त्यामुळे गावावर दरड कोसळण्याच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे.

अंभेरपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेल्या 76 घरांची सुमारे 500 लोकवस्ती असलेल्या गावाला दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने गावालगत असलेल्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. भूस्खलन होऊन दगड-माती खचून खाली शेतीत आली असून, ग्रामस्थ भीतीने रात्र जागून काढत आहेत. माळीण गावच्या झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. 14 वर्षांपूर्वी 26 जुलै 2005 ला झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावात दरड कोसळण्याची घटना घडली होती; परंतु सुदैवाने दरड गावाच्या दिशेने खाली न आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. 

बाहेरगावावरून परत येताना तुंगा गावाच्या बाजूलाच असणाऱ्या डोंगरावर दगड-माती खाली आल्याचे पाहिले. काही ठिकाणी डोंगराला भेगा पडलेल्या दिसल्या. आमचा गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेला असल्याने दरड कोसळण्याची भीती वाटते. 
-निरुपम तुंगे, ग्रामस्थ, तुंगी 

26 जुलै 2005 मध्‍ये झालेल्या अतिवृष्टीने गावात दरड कोसळून भातशेतीचे नुकसान झाले होते. त्याप्रमाणे या वेळीही पाण्यामुळे दरड कोसळण्याची शक्‍यता आहे. डोंगरातून दगड-माती येत आहे. आमच्या दोन-तीन दिवस वीज नसल्याने मोबाईलही बंद होते. त्यामुळे कोणाशी संपर्कही झाला नाही. 
-बाळू बांगर, ग्रामस्थ, तुंगी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landside at Tungi vilage