घाटकोपरमध्ये दरडींचा धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

घाटकोपर - महापालिकेच्या अर्धवट कारवाईमुळे डोंगरावरून आपल्या घरांवर कधीही राडारोडा पडू शकतो किंवा पावसाच्या पाण्याचे ओहोळ घरात शिरून सामानाचे नुकसान होण्याच्या भीतीखाली घाटकोपरच्या टेकडीवरील घरांतील रहिवासी रोजचा दिवस काढत आहेत. डगलाईन परिसरात तीन वसाहतींतील रहिवासी पाऊस पडत असेल तर चक्क रात्रभर जागून काढत आहेत. 

घाटकोपर - महापालिकेच्या अर्धवट कारवाईमुळे डोंगरावरून आपल्या घरांवर कधीही राडारोडा पडू शकतो किंवा पावसाच्या पाण्याचे ओहोळ घरात शिरून सामानाचे नुकसान होण्याच्या भीतीखाली घाटकोपरच्या टेकडीवरील घरांतील रहिवासी रोजचा दिवस काढत आहेत. डगलाईन परिसरात तीन वसाहतींतील रहिवासी पाऊस पडत असेल तर चक्क रात्रभर जागून काढत आहेत. 

मे २०१७ मध्ये महापालिकेने तानसा पाईपलाईन परिसरातील हजारो झोपड्या तोडल्या. कारवाईदरम्यान तेथील संरक्षक भिंतही पाडली. पण नंतर महापालिकेने ती बांधली नाही. तोडण्यात आलेल्या झोपड्यांचा निम्मा राडारोडा तसाच ठेवला. त्यात वरून येणारे पाणी व माती साठून ढीग खाली ढासळतो. त्यामुळे परिसरात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जुन्या संरक्षक भिंती नसल्याने गतवर्षी पावसात इथल्या अष्टविनायक सोसायटीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हाच डगलाईन ते कातोडीपाडा रहिवाशांनी संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी केली होती.  पालिका अभियंत्यांनी पाहणी करून संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले; मात्र ते काम अर्धवट राहिल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. अष्टविनायक सोसायटी, कल्पवृक्ष सोसायटी आणि विकास सोसायटीतील रहिवासी भयभीत आहेत. पालिकेने तानसा पाईपलाईनवरील डोंगराच्या मध्यभागी असणाऱ्या हजारो झोपड्या तोडल्या. त्यामुळे खंडोबा टेकडीवर वसलेल्या झोपड्या व रामनगरच्या खालच्या दिशेकडे असणाऱ्या झोपड्या माती खचून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. समस्यांवर उपाय होत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत.

भिंत बांधण्याचे काम सुरू आहे; मात्र मनुष्यबळ कमी असल्याने आमची अडचण होत आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे आम्ही रहिवाशांना नोटीस बजावतो. त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
- जगदीश चव्हाण, पालिका उपअभियंता

पालिकेने पावसाळ्यापूर्वी उपाययोजना न केल्याने यंदाही आम्हाला पावसाशी दोन हात करत रात्रीचा पहारा द्यावा लागत आहे.
- अश्‍विनी बच्चे, रहिवासी, कल्पतरू सोसायटी

Web Title: landslide dangerous in Ghatkopar

टॅग्स