esakal | बीडीडी चाळींचा पुनर्विकास मंदावला, सोडतीसाठी मंत्र्यांना वेळ मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

बीडीडी चाळींचा पुनर्विकास मंदावला, सोडतीसाठी मंत्र्यांना वेळ मिळेना

बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकसकांमार्फत राबविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत सरकारविरोधात संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास मंदावला, सोडतीसाठी मंत्र्यांना वेळ मिळेना

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई: म्हाडामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची गती मंदावत चालली आहे. ना.म.जोशी मार्ग येथील पुनर्वसन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेल्या पात्र भाडेकरूंना घरे वितरित करण्याची सोडत मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने रखडली आहे. यातच बीडीडी चाळींचा पुनर्विकास खासगी विकसकांमार्फत राबविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत सरकारविरोधात संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा 22 एप्रिल 2017 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाले. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम एलऍण्ड टी कंपनीला दिले आहे. ना.म.जोशी मार्गावरील चाळींच्या पुनर्विकासाचे काम शहापूरजी ऍण्ड पालनजी आणि वरळी येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची निवड करण्यात आली आहे. भूमिपूजनानंतर गेली तीन वर्ष पुनर्विकासाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याने निवड झालेल्या कंपनीने प्रकल्पातून माघार घेण्याचे पत्र म्हाडाला दिले होते. तर ना.म.जोशी मार्गावरील चाळींच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू असताना सरकारने पात्र भाडेकरूंना पुनर्वसन इमारतीमध्ये घरे देण्यासाठी आयोजित केलेली सोडत तीन वेळा रद्द केली आहे.

महत्त्वाची बातमी- स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याबाबत शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय

15 मार्च 2020 रोजी कोरोनाचे कारण पुढे करत ना.म.जोशी मार्गावरील रहिवाशांची सोडत रद्द करण्यात आली. त्यानंतर 29 ऑक्‍टोबरला मंत्र्यांना वेळ नसल्याने सोडत रद्द झाली.  तिसऱ्यांदा 3 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली सोडतही एक दिवस अगोदर रद्द केली. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम खासगी विकसकाला देण्याचा सरकारचा डाव असून यासाठी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण झाल्याचा आरोप, बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केला आहे. मागील सरकारचा प्रकल्प म्हणून हे सरकार अशा पद्धतीने निर्णय घेणार असेल तर आम्ही तो हाणून पाडू, असा इशाराही नलगे यांनी दिला.
 
नायगाव प्रकल्पात एलऍण्डटीला पुन्हा रस

साडे चार महिन्यांपूर्वी नायगाव बीडीडी प्रकल्प राबविण्यास नकार देणाऱ्या एलऍण्डटी कंपनीने पुन्हा प्रकल्प राबविण्यात स्वारस्य दाखवले आहे. मात्र नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून विरोध कायम असल्याने या ठिकाणच्या पुनर्विकासाचा पेच कायम आहे. सरकारकडून याबाबतही ठोस निर्णय होत नसल्याने रहिवाशी संभ्रमात आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Larsen and Toubro undertake Naigaon BDD chawl redevelopment project MHADA Mumbai board