सीएसटी-कुर्ला दरम्यानच्या नव्या मार्गिकांना लेटमार्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

कुर्ला-परळ मार्गिकेसाठी 2021 उजाडणार

कुर्ला-परळ मार्गिकेसाठी 2021 उजाडणार
मुंबई - लांब पल्ल्याच्या गाड्यांना मार्ग मोकळा करतानाच लोकलचा प्रवासही सुकर करण्यासाठी सीएसटी ते कुर्ला या पाचव्या व सहाव्या मार्गिकांचे काम एमआरव्हीसीमार्फत (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) केले जाणार आहे. हे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मार्गातील परळ ते कुर्ल्यापर्यंतचे काम पूर्ण करण्यासाठी 2021 पर्यंत अवधी लागेल. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी उशीर होऊ शकतो, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एमआरव्हीसीमार्फत "एमयूटीपी 2' अंतर्गत रेल्वे सीएसटी ते कुर्ला दरम्यानचे पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम 2019 पर्यंत पूर्ण करायचे आहे. या मार्गात बरेच अडथळे असल्याने काम सुरू करण्यास उशीर होत आहे. सॅण्डहर्स्ट आणि मस्जिदबंदर स्थानकांदरम्यान काही रहिवासी इमारती असल्याने या मार्गासाठी अन्य पर्यायही शोधण्यात आला. त्यासाठी सीएसटीतील हार्बरचे दोन फलाट सीएसटीच्या पी. डीमेलो रोडच्या दिशेला हलवून सीएसटी ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी मार्ग मोकळा केला जाईल. या मार्गातील प्रथम परळ ते कुर्ला हा टप्पा पूर्ण केला जाईल आणि त्यानंतरच परळ ते सीएसटीपर्यंतचे काम हाती घेतले जाईल. परळपासून कुर्ल्यापर्यंतचे काम याआधी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. हे काम पूर्ण करण्यात तांत्रिक अडचणी असून, त्यासाठी 2021 पर्यंतचा अवधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा परिणाम सीएसटी ते परळपर्यंतच्या कामावरही होण्याची शक्‍यता आहे. ही मार्गिका पूर्ण होण्यास 2019 पेक्षाही अधिक कालावधी लागण्याची शक्‍यता आहे, असे सांगण्यात आले.

Web Title: late mark cst-kurla new route