...जनता कर्फ्यू असूनही ते खेळत होते क्रिकेट!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते; मात्र असे असतानाही या जनता कर्फ्यूदरम्यान क्रिकेट खेळणाऱ्या नऊ जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.

कल्याण : २० मार्चपासून कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते; मात्र असे असतानाही या जनता कर्फ्यूदरम्यान क्रिकेट खेळणाऱ्या नऊ जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. अशी माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? आदेश धुडकावून त्यांनी लावलं लग्न! पुढे काय झालं वाचा तुम्हीच... 

कल्याण पश्चिमेच्या काळा तलाव परिसरातील मैदानात काही तरुण हे क्रिकेट खेळत होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा संभव आहे हे आणि कर्फ्यु तसेच मनाई आदेश आहे माहिती असतानाही या तरुणांनी या आदेशाचा भंग केला.  याची गंभीर दखल घेत पोलिसांनी या सर्वांवर भा.द.वि. कलम 188 (मनाई आदेशाचा भंग करणे), 269 (जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असणारी हयगयाची कृती) 290 (सार्वजनिक उपद्रवाबद्दल शिक्षा) महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37 (3)135 (जमावबंदी कायद्याचा भंग) यासह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) अन्वये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी वाचली का? नमाजासाठी जमलेल्या 600 हून नागरिकांवर गुन्हा

सरकारच्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवली महापालिका विविध उपाययोजना करत आहे; मात्र त्यानंतरही पालिकेच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त करतानाच अनेक प्रश्न उपस्थित करणारी एक पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यात आली होती. पालिका प्रशासनाने याबाबत अधिक माहिती घेतली असता हा केवळ खोडसाळपणा असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेल्या शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध पोलिस ठाण्यांत एकूण १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. भारतीय दंड विधानातील कलम १८८ नुसार कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्यामध्ये ३ गुन्हे, कोळसेवाडी पोलिस ठाण्यात १, डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात तब्बल ५ असे ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legal action in Kalyan against nine people playing cricket during Janata curfew