आयआयटी पवईत बिबट्याचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

आयआयटी परिसरात बिबट्या दिसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने रात्री गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : पवईतील आयआयटी संकुलात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे घबराट पसरली आहे. याबाबत सुरक्षा रक्षकांनी तक्रार केल्यानंतर वन विभागाने आयआयटी संकुलात रात्री गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरातच पवईतील आयआयटी ही शैक्षणिक संस्था आहे. जंगलालगतच्या परिसरात अनेकदा बिबट्याचा वावर आढळतो. आयआयटी संकुलात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री आलेल्या बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. बिबट्याच्या अधिवासानजीकच्या भागात आयआयटी संकुल आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच या परिसरात बिबट्याचे दर्शन होते, असे वाईल्डलाईफ कॉंझर्व्हेशन सोसायटीचे संस्थापक कृष्णा तिवारी यांनी सांगितले.

 

याआधीही दिसला होता बिबट्या

यापूर्वीही आयआयटी संकुलात बिबट्या दिसला होता; मात्र कुणावरही हल्ला झाल्याची नोंद नाही. बिबट्याचा अधिवास असलेल्या आणि नजीकच्या क्षेत्रात मध्यरात्री जाऊ नये. गरज भासल्यास आवश्‍यक काळजी घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे. बिबट्या हल्लेखोर प्राणी नाही. दगडफेक अथवा जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास बचावासाठी बिबट्या हल्ला करतो, असेही तिवारी म्हणाले.

 

आयआयटी परिसरात रात्रीची गस्ती सुरू करत आहोत. वन विभाग नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. बिबट्याच्या अधिवासाचे क्षेत्र आणि नजीकच्या भागांत जाताना नागरिकांनी काळजी घ्यावी. वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे
- संतोष कंक, वन परिक्षेत्रपाल, मुंबई विभाग, ठाणे प्रादेशिक वन विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard appeared in IIT Powai