
समृध्दी महामार्गावरून धावणाऱ्या नागपूर - शिर्डी बसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी समृध्दी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर एसटी महामंडळाने नागपूर - शिर्डी या मार्गावर आपली वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरू केली आहे. १५ डिसेंबर रोजी प
हिली फेरी धावली असून, सुरुवातीच्या सहा दिवसात फक्त १५८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. या बस मध्ये ३० आसनी पुशबॅक तर १५ स्लीपर शयन आसनी असे एकूण ४५ आसनी बस आहेत. मात्र, या बसला समृध्दी महामार्गांवर कोणत्याही सुविधा नसल्याने प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये पहिला टप्पा नागरिकांसाठी सुरू करण्यात आला असून, नागपूरहून शिर्डी जाणाऱ्या भाविकांना नॉनस्टॉप एसटी सेवा प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
मात्र, या सेवेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचे १६ दिवसाच्या प्रवाशांच्या आकडेवारी वरून दिसून येत आहेत. नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता विशेष सेवा सुटत असून, दोन्ही ठिकाणी पहाटे ०५.३० वाजता पोहचते. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होत असल्याची घोषणा एसटी महामंडळाने केली होती.
त्याप्रमाणे चार तास आधी भाविकांना शिर्डीत पोहचवत असतानाही नागरिकांनी या सेवेला नापसंती दर्शवल्याने एसटी प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति १३०० रुपये तर मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात येत आहे.
तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत या बस मध्ये दिली जात आहे. सुरुवातीचे काही दिवस प्रवाशांचा ओढा कमी होतं मात्र, आता प्रवाशांची पसंती दिसून येत असल्याचे नागपूर विभागाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी सांगितले आहे.
शिर्डी जातांना नेहमी ट्रॅव्हल्स ने आम्ही प्रवास करतो, शिवाय एसटी महामंडळाच्या तिकीट दरापेक्षा खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट स्वस्त आहे. त्यामुळे सध्या अजून एसटीच्या प्रवासाचा अनुभव घेतला नाही.
- मंगेश आगासे, भाविक
समृध्दी महामार्ग ने १०२ किलोमीटरचा प्रवास करतांना मधात थांबे आवश्यक आहे. लहान मुलं, वयोवृद्ध सहकारी असतात, महिला असतात त्यामुळे रस्त्याने रुग्णालयांसह जेवण, चहा नाश्ता आणि हॉटेलची सुविधा आवश्यक असते. अद्याप अशा कोणत्याही सुविधा समृध्दी मार्गाने निर्माण झाल्या नसल्याने एसटीचा प्रवास करणे योग्य वाटत नाही.
- नितीन काळे, भाविक, नागपूर
१५ ते २६ डिसेंबर नागपूर शिर्डी प्रवासी वाहतूक
नागपूर ते शिर्डी या मार्गावर १५ ते २६ डिसेंबर दरम्यान २११ प्रवाशांनी प्रवास केला आहे. ज्यामध्ये १९१ पौढ प्रवासी असून, १ ज्येष्ठ नागरिक आणि १९ अमृत महोत्सव ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून २ लाख ४० हजाराचे उत्पन्नाची कमाई झाली आहे. त्याप्रमाणेच शिर्डी - नागपूर परतीच्या मार्गावर फक्त एकूण १८३ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यापैकी १५७ पौढ, ७ ज्येष्ठ नागरिक आणि १९ अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. असे एकूण या १६ दिवसात एकूण ३९४ प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली आहे.