नैराश्‍यावर बोलू चला! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नैराश्‍याच्या गर्तेत... 
- नैराश्‍याचे रुग्ण 1990 ते 2013 दरम्यान दुप्पट 
- महिलांमधील नैराश्‍यामुळे मुलांचा विकास खुंटतो 
- नैराश्‍याने ग्रस्त 50 टक्के रुग्ण उपचार टाळतात 
- उपचारासाठी जगभर दरवर्षी एक लाख कोटी डॉलर खर्च 

मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम "डिप्रेशन' (नैराश्‍य) असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी "डिप्रेशनवर चला बोलू या' असे घोषवाक्‍यही ठरवले आहे. 

नैराश्‍य ही जागतिक पातळीवर आज मोठी समस्या आहे. बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, प्रदूषण, स्पर्धा, जुनाट आजार अशा कारणांमुळे नैराश्‍याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यंदा जागतिक आरोग्य दिनाची थीम "डिप्रेशन' असल्याचे जाहीर केले. या आरोग्य दिनापासून (7 एप्रिल) वर्षभर या थीमच्या अनुषंगाने जगभर चर्चासत्रे, परिसंवाद, तपासण्या, औषधोपचार आदी कार्यक्रम घेण्यात येतील. नैराश्‍य या मनोविकाराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून त्यावर योग्यवेळी उपचार करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. नैराश्‍यावर उपचार टाळण्याकडे लोकांचा कल असतो. हा विकार आहे, हेच अनेकांना माहीत नसते किंवा ते समजून घेतले जात नाही. नैराश्‍याचे शेवटचे टोक म्हणजे आत्महत्या. नैराश्‍य रक्तदाब आणि मधुमेहालाही आमंत्रण देते. त्यामुळे या आजाराविषयी जनजागृतीचे काम जागतिक आरोग्य संघटना करणार आहे. 

Web Title: Let's talk about the depression!