127 उमेदवारांची यादी शिवसेनेकडून गुलदस्तात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - शिवसेनेचे 100 उमेदवार निश्‍चित झाले असून, या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, उरलेल्या 127 प्रभागांत बंडखोरी होण्याच्या भीतीने उमेदवारांची नावे त्यांनी गुलदस्तात ठेवली आहेत.

मुंबई - शिवसेनेचे 100 उमेदवार निश्‍चित झाले असून, या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, उरलेल्या 127 प्रभागांत बंडखोरी होण्याच्या भीतीने उमेदवारांची नावे त्यांनी गुलदस्तात ठेवली आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीत युती होणारच नाही, हे गृहीत धरून शिवसेनेने सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. याबाबतचे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार ऑक्‍टोबरमध्ये प्रभागांचे आरक्षण झाल्यानंतर ठाकरे यांनी 100 उमेदवार निश्‍चित केले. विद्यमान नगरसेवकांसह दोन विभागप्रमुख आणि काही माजी नगरसेवकांची नावे या यादीत आहेत. त्यांना कामाला लागण्याचे आदेश "मातोश्री'वरून याआधीच देण्यात आले आहेत. या प्रभागांत शिवसेनेला बंडखोरी होण्याची भीती नाही.

उरलेल्या 127 प्रभागांत उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रियाही विभाग पातळीवर सुरू करण्यात आली होती. यात सर्वाधिक खुले प्रभाग आहेत. त्यामुळे या प्रभागांत सात ते आठ इच्छुक आहेत. अशा वेळी एकाचे नाव आताच जाहीर केल्यास बंडखोरी होण्याची भीती आहे. त्यामुळे या 127 प्रभागांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. पक्षश्रेष्ठींनी या प्रभागांची यादी राखून ठेवली आहे.

नवा-जुना वाद
अनेक नेते-कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले आहेत. यामुळे आता नवे-जुने असा वाद सुरू झाला आहे. विभागप्रमुखांनी तयार केलेल्या अंतिम यादीत पक्षात नव्याने आलेल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पूर्वीपासून शिवसेनेत असलेला मोठा गट नाराज आहे. या नाराज गटाने बंडखोरी केली नाही तरी निवडणुकीच्या काळात पक्षाचे काम केले नाही, तर शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे.

Web Title: The list of 127 candidates of Shiv Sena