दिघ्यातील रहिवाशांचा जीव धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

दिघा विभागातील मुकंद कंपनी व युरेस्ट्रा कंपनीच्या सुरक्षा भिंती जीर्ण झाल्या असून, या भिंतींना तडे गेले आहेत. या भिंती पडून मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे.

नवी मुंबई : पालिकेच्या दिघा विभागातील मुकंद कंपनी व युरेस्ट्रा कंपनीच्या सुरक्षा भिंती जीर्ण झाल्या असून, या भिंतींना तडे गेले आहेत. या भिंती पडून मोठी जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या कंपन्यांनी जीर्ण झालेल्या सुरक्षा भिंतींची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी एच प्रभाग समिती अध्यक्ष जगदीश गवते यांनी विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.

रामनगर ते मुकंद सर्विस रस्त्यालगत असलेल्या युरेस्ट्रा कंपनीची जीर्ण झालेली भिंतीची मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पडझड झाली. या कंपनीच्या भिंतीला लागूनच रामनगर येथील सूर्यदर्शन चाळ आहे. ही सुरक्षा भिंत कंपनीच्या आवारात पडल्यामुळे अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या वर्षीही या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. युरेस्ट्रा कपंनीने काही वर्षांपूर्वी उत्खनन केल्यामुळे ही भिंत पडली असल्याचा आरोप नगरसेविका शुभांगी गवते यांनी केला असून, पालिका अधिकाऱ्यांना निवेदनामार्फत युरेस्ट्रा कंपनीला सुरक्षा भिंत बांधण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. 

मागील वर्षी पालिका अधिकाऱ्यांनी युुरेस्ट्रा कंपनीला सुरक्षा भिंत जीर्ण झाली असल्याची नोटीसदेखील बजावली होती. मात्र, युरेस्ट्रा कपंनीने याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप गवते यांनी केला आहे. यंदाच्या वर्षी पुणे, मुंबईमध्ये इमारतीच्या सुरक्षा भिंती कोसळून अपघात झाल्याने त्यामध्ये मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे युरेस्ट्रा, मुकंद कंपनीच्या सुरक्षा भिंती कोसळण्याच्या भीतीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. या संदर्भात पालिका विभाग अधिकारी प्रियंका काळेसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुकंद कंपनी व युरेस्ट्रा कंपनीला ज्या ठिकाणी सुरक्षा भिंतीची पडझड झाली आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे पत्र दिले असल्याची माहिती दिली.

मुकंद, युरेस्ट्रा कंपन्यांच्या सुरक्षा भिंती कुमकुवत झाल्यामुळे, या भिंतींना लागून असणाऱ्या घरांवर भिंत पडून अपघात होण्याची शक्‍यता आहे. पालिका प्रशासनाने कंपनीला सुरक्षा भिंत दुरुस्ती करण्यास बजावावे. यासाठी पालिकेसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- जगदीश गवते, अध्यक्ष, दिघा प्रभाग समिती, नवी मुंबई महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lives of residents are in danger In digha.