कर्ज परतफेडीसाठी 60 दिवस मुदतवाढ

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

रिझर्व्ह बॅंकेचे हे स्वागतार्ह पाऊल आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांनी कर्जाची परतफेड करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बॅंकेचा कर्जदारांना दिलासा, एक कोटी रुपयांपर्यंतची मर्यादा
मुंबई - देशभरातील चलन तुटवड्याची दखल घेऊन एक कोटी रुपयांपर्यंतच्या गृह, मोटार, कृषी आणि अन्य कर्जाची परतफेड करण्यासाठी साठ दिवसांचा अतिरिक्त कालावधी रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी दिला.

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत परतफेड असणाऱ्या कर्जासाठी ही मुदतवाढ असेल. सध्या असलेल्या परतफेडीच्या मुदतीत साठ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ही सवलत कोणत्याही बॅंकेतील एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी असणार आहे. या सवलतीचा फायदा व्यावसायिक अथवा खासगी कर्जदारांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या बॅंका, वित्तसंस्थांमधील कर्जालाही लागू असेल. यात कृषी व गृहकर्जाचा समावेश आहे.

पाचशे व हजारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम बॅंकिंग व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. बॅंकांतील धनादेश वटण्यासह अन्य कामकाज यामुळे ठप्प झाले आहे. तसेच आठवड्याला 24 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे बॅंक खात्यातून काढता येत नसल्याने नागरिकांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे कर्ज परतफेड करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: loan debt repayment extension to 60 days