लोकल प्रवास महागणार? 

लोकल प्रवास महागणार? 

मुंबई - मुंबईतील लोकलसेवा देशातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे या लोकल प्रवाशांना आणखी सोईसुविधा हव्या असतील, तर त्यांनी त्यासाठी अधिक पैसे मोजणे गरजेचे आहे, असे सांगत रेल्वे मंडळाचे (रोलिंग स्टॉक) सदस्य राजेश अग्रवाल यांनी बुधवारी भाडेवाढीचे अप्रत्यक्ष संकेतच दिले. 

मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या अग्रवाल यांनी मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या लोकल कारशेडची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबईतील लोकलसेवा खूपच स्वस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 रुपयांत होतो. हाच प्रवास टॅक्‍सीने केल्यास हजार रुपये मोजावे लागतात. आता लोकलचा वेग वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत 12 वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल होणार आहेत. मात्र, मुंबईकरांना अधिक सोईसुविधा हव्या असतील तर त्यासाठी त्यांनी अधिक पैसे मोजण्याची आवश्‍यकता आहे. सध्याच्या तिकीटदरात अधिक सुविधा पुरविणे शक्‍य नाही, असेही ते म्हणाले. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेले हे विधान म्हणजे लोकल दरवाढीचे सूतोवाच मानले जात आहे. 

मुंबईच्या लोकलमधून दिवसाला 80 लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे उपनगरी रेल्वेचा विकास आणि जलद प्रवासावर भर देणे आवश्‍यक असून, त्या दृष्टीने प्रकल्प राबवण्यात येत आहेत असे सांगून ते म्हणाले, लोकल प्रवास वेगवान करण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आव्हान आहे. सध्या लोकल ताशी 100 किलोमीटर वेगाने धावतात. ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगासाठी लोकलची चाचणी लवकरच घेण्यात येईल. 

लोकलमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. विरार स्थानकात मोटरमनसाठी सिम्युलेटर बसवण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षी सहा हजार डब्यांचे उत्पादन केले; या वर्षी आठ हजार डब्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. यंदाच्या पावसाळ्यात लोकल वाहतूक ठप्प होणार नाही, असा विश्‍वासही अग्रवाल यांनी व्यक्त केला. 

एसी लोकलची दरवाढ 
देशातील पहिली वातानुकूलित लोकल चर्चगेट ते विरार या स्थानकांदरम्यान धावत आहे. वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून सुरुवातीची दीड वर्षे तिकीट दरांत सवलत देण्यात आली होती. आता 3 जूनपासून प्रथम वर्गाच्या तिकीट दरांत 1.3 पट वाढ करण्यात आली आहे. रेल्वे मंडळाकडून मुंबई उपनगरी रेल्वेसाठी एकूण 12 वातानुकूलित लोकल मिळणार आहेत. या 12 एसी लोकल 2020 पर्यंत दाखल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com