मुंबईत सरसकट लोकल प्रवास लांबणीवर? सध्याच्या प्रवासातही कपातीचे संकेत

प्रशांत कांबळे
Sunday, 22 November 2020

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून आता सरसकट लोकल प्रवासाचा प्रस्ताव काही काळ लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून आता सरसकट लोकल प्रवासाचा प्रस्ताव काही काळ लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. यासोबत लोकलमध्ये प्रवासाची मुभा मिळालेल्या काही घटकांच्या प्रवासालाही ब्रेक लावण्याचे संकेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी "सकाळ'शी बोलताना दिले. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अजून काही दिवस धीर धरावा लागणार आहे. 

हेही वाचा - कॉमेडी क्वीन भारती सिंगला चार तासांच्या चौकशीनंतर NCBकडून अटक

दिल्लीत कोव्हिडचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे मुंबईतही अधिक खबरदारी घेण्याचा सरकारचा विचार आहे. मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने काही आठवड्यापूर्वी रेल्वेकडे दिला होता. या प्रस्तावावरून रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारणही रंगले; मात्र या प्रस्तावावर आता आस्ते कदम चालण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. मध्यंतरी समाजातल्या अनेक घटकांना लोकल प्रवासाची मुभा राज्य सरकारने दिली होती. त्यामुळे लोकलमधील गर्दी वाढली होती; मात्र सध्याचा धोका लक्षात घेता यातील काही घटकांना प्रवासातून वगळण्यावरही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

रेल्वे, राज्य सरकारमध्ये एकमत 
सरसकट लोकल सुरू झाल्यास दिवसाला 80 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार आहे. त्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यास प्रशासनाने आटोक्‍यात आणलेली परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. सर्वसामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी लोकल प्रवास थोडा लांबवावा, एवढे महिने मुंबईकरांनी तग धरला आहे. लोकल सुरू होण्यासाठी अजून काही दिवस त्रास सहन करावा, असे मत रेल्वे अधिकाऱ्यासोबत राज्य सरकारचे अधिकारीही व्यक्त करत आहेत. त्यामुळे दिल्लीत आलेल्या कोरोना लाटेमुळे लोकल प्रवासासंदर्भात पहिल्यांदा रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये एकमत झाल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - नागपाडा दुर्घटनेतील इमारत मालकाचा जामीन नामंजूर; खबरदारीअभावी घडली घटना

महापौरांचे विधान सूचक 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील लोकल सुरू करण्याची घाई करू नये, असे विधान केले होते. कोव्हिड नियोजनाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या मुंबई महापौरांचे विधान या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

हवाई सेवेवरही परिणाम? 
दिल्ली आणि इतर राज्यांतून मुंबईत उतरणाऱ्या विमान मार्गानेदेखील प्रवाशांची वाहतूक होते. त्याद्वारे पुन्हा मुंबईवर कोरोनाचे संकट ओढवू नये. यासाठी राज्य सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीने विमान सेवादेखील काही काळ स्थगित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Local trrain for all in Mumbai postponed Signs of a cut even on the current trip

-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local trrain for all in Mumbai postponed Signs of a cut even on the current trip