esakal | लॉकडाऊनचा फटका; रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown affect

लॉकडाऊनचा फटका; रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळेना

sakal_logo
By
कुलदिप घायवट

मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील कोरोनामुळे लोकलमध्ये सर्वसामान्य प्रवास करण्यास निर्बंध आले आहेत. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांवर दररोजचा व्यवसाय अवलंबून असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांना भाडे मिळविणे कठीण झाले आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करतो. मात्र, वर्क फ्रॉम होममुळे खासगी कर्मचारी कमी झाले आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना सध्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी मिळत आहेत. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून घर चालविणे रिक्षा, टॅक्सी चालकांना अवघड झाले आहे. काही चालकांनी सध्याच्या परिस्थितीला कंटाळून रिक्षा, टॅक्सी चालविणे बंद केले आहे.

गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांचे जगणे मुश्किल झाले होते. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक फेब्रुवारीपासून लोकल सुरू केली होती. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळणे सुरू झाले. यावेळी रिक्षा, टॅक्सी चालकांनाच्या हाती खूप महिन्यांनी चांगले पैसे येऊ लागले होते. मात्र पुन्हा लोकल प्रवासावर निर्बंध आल्याने प्रवासी संख्या कमी झाली आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णाकडून नर्सवर चाकू हल्ला

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यापासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांची वाईट अवस्था झाली आहे. व्यवसायातून ४० टक्क्यांहून कमी उत्पन्न मिळत आहे. लोकल सुरू झाली होती. त्यावेळी ७० टक्के उत्पन्न मिळत होते. मात्र आता १२ तास काम करून सुध्दा ४०० रुपये हाती येणे कठीण झाले आहे. अनेक रिक्षा, टॅक्सी चालक गावी गेल्याने किंवा अन्य काम करत आहे. परिणामी मुंबईतील रस्त्यावर फिरणाऱ्या रिक्षा, टॅक्सींची संख्या कमी झाली आहे. सध्या फक्त ४० टक्के रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर धावत आहेत. रिक्षा, टॅक्सी चालकांना १० हजार महिना भत्ता देण्यात यावा. त्याची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही, असे मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

लोकल आणि बाहेरील राज्यातील ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांचे उत्पन्न अत्यल्प झाले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी खूप कमी संख्येने रिक्षा, टॅक्सीमधून प्रवास करतात. रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक रुग्णवाहिकेतून जातात. त्यामुळे चालकांना प्रवासी मिळत नाही. परिणामी, 1 हजार ते 1 हजार 200 रुपये लॉकडाऊनपूर्वी मिळत होते. मात्र आता 200 ते 300 रुपये चालकांना मिळत आहेत. सरकारच्या नियमांनुसार टॅक्सीमध्ये दोन प्रवासी संख्या ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने टॅक्सीमध्ये तीन प्रवासी बसून देण्यास परवानगी देण्यात यावी.

ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात व्यवसाय अवलंबून आहे. मात्र, राज्य सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम केले आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलात येणारे कर्मचारी कमी झाली आहे. लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. बाजारपेठा बंद, दुकाने बंद, फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. त्यामुळे इतर प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, आता फक्त 100 ते 200 रुपये कमाई होत आहे.

राजमानी शुक्ला, रिक्षा चालक, वांद्रे टर्मिनस

हेही वाचा: तब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा

रिक्षा, टॅक्सीवर निर्बंध आणू नये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कडक लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत. यामध्ये रिक्षा, टॅक्सी सुरूच ठेवावी. सध्या तुंटपुज्या कमाईत घर चालविले जात आहे. ही कमाई बंद झाल्यास उपासमारीची वेळ येईल. मुंबईला धावते ठेवण्याचे काम लोकल, रिक्षा, टॅक्सी, बस सेवा करते. त्यामुळे यांना बंद करू नका, अशी हाक रिक्षा, टॅक्सी चालकांकडून करण्यात आली आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Lockdown affect Rickshaw and taxi drivers could not find passengers

loading image
go to top