घरातच 'लॉक' झाल्याने जेष्ठ नागरिक झाले मानसिकरित्या 'डाऊन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आर्थिक व भौतिक परिणाम उदभवत असतानाच अनेक सामाजिक परिणामदेखील जाणवू लागले आहेत. मॉर्निग वॉक, शतपावलीअभावी कट्टयाशी तुटलेला संपर्क या जेष्ठ नागरिकांना अडचणींचा ठरत आहे.

ठाणे : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आर्थिक व भौतिक परिणाम उदभवत असतानाच अनेक सामाजिक परिणामदेखील जाणवू लागले आहेत. मॉर्निग वॉक, शतपावलीअभावी कट्टयाशी तुटलेला संपर्क या जेष्ठ नागरिकांना अडचणींचा ठरत आहे. त्यातच, गेले अनेक दिवस मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्यक्ष संवाद तुटल्याने, आरोग्याच्या तपासणीसाठी दवाखान्यांचा शोध, जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी परावलंबी व्हावे लागल्याने या जेष्ठांसाठी हा लॉकडाऊन काळ म्हणजे, कोंडमारा ठरत आहे, अशा प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. 

मोठी बातमी ः कोरोनाच्या नावाखाली मध्य रेल्वेचा 94 लाखांचा खर्च; माहिती अधिकारातून उघड

दोनच दिवसांपूर्वी ठाण्यातील एसआरए टॉवरमधील सदनिकेत एकट्या राहणाऱ्या शैला जोशी नामक 80 वर्षीय जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंधी पसरल्याने चार दिवसानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पुन्हा एकदा असहाय्य जेष्ठ नागरिकांच्या मदतीचा गंभीर प्रश्न आवासून उभा ठाकला आहे. ठाण्यातील नौपाडा, घोडबंदर, लोकमान्य-सावरकर नगर येथे असे अनेक जेष्ठ नागरिक एकटे राहतात. यातील शेकडो नागरिकांची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात असतात. तर, काहीजण निराधार आहेत.

मोठी बातमी ः '18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

सध्या या जेष्ठ नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. जीवनावश्यक वस्तू आणणे, आरोग्य तपासणी, यासाठी जेष्ठ नागरिकांना बाहेर पडावे लागते. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे आजारी जेष्ठ नागरिकांचे सर्वाधिक हाल होत आहेत. याबाबत सावरकरनगर परिसरातील अपुर्वा गुरव म्हणाल्या, मी घरात एकटी राहते. गेल्या दीड महिन्यांपासून कट्ट्यावर गेले नाही. त्यामुळे सर्वांची आठवण येते. आम्ही एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेतो, मात्र, गेल्या दीड महिन्यांमध्ये कोणाशीही प्रत्यक्ष संवाद होत नाही. त्यामुळे खूप एकटेपणा वाटतो. काही दिवसांपूर्वी मला आजारपण आले होते. जेष्ठ नागरिक संघाच्या मदतीने मला मदत मिळाली. 

मोठी बातमी ः महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधितांची संख्या वाढणार? 22 हजार खाटा तयार ठेवण्याच्या सूचना

नौपाड्यातील प्रतिभा कुलकर्णी यांनीही अनेक अडचणींचा सामना करत असल्याचे सांगितले. एका अपघातामुळे मला मणक्याचा त्रास आहे. त्यासाठी औषधे, तपासणी करता येत नाही. डॉक्टर ऑनलाईन सल्ले देतात, असे कळले होते. मात्र, मोबाईल फोन वापरता येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मदतीने मला औषध तपासणीला जावे लागत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये कट्टा सुना
ठाणे शहरात जेष्ठ नागरिकांसाठी अनेक कट्टे आहेत. या कट्ट्यांवर हे जेष्ठ नागरिक सकाळी आणि सांयकाळी एकत्र येतात. याठिकाणी वाढदिवस साजरे होतात. अनेक कार्यक्रम, कार्यशाळा घेतल्या जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे हे कट्टे सुने पडले आहेत.

मोठी बातमी ः हृदयद्रावक ! ...आणि मुलांनी वाटेतच आपल्या बापाला गमावलं, वाचा मन सुन्न करणारी बातमी

ठाण्यात हजारो जेष्ठ नागरिक असुन यातील काहीजण एकटेच राहतात. त्यांना जीवनावश्यक वस्तू, औषधे मिळणे कठीण झाले आहे.  आम्ही आता या जेष्ठ नागरिकांचा एकटेपणा घालविण्यासाठी ररोज व्हिडीओ कॉल किंवा फोन करून गप्पा मारत असतो.
- आसावरी फडणीस, अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती, ठाणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown effects on senior citizen amid corona outbreak