उत्तर मध्य मुंबईत शेलारांनी डाव जिंकला!

उमेदवारी टाळण्याचे केले होते आटोकाट प्रयत्न; उज्ज्वल निकम यांच्या नावाच्या घोषणेने लढतीचे चित्र स्पष्ट
lok sabha election ashish shelar candidate mumbai political
lok sabha election ashish shelar candidate mumbai politicalSakal

- विजय चोरमारे

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून उत्तर मध्य मुंबईतून वकील उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर झाले आणि मुंबईतील एक बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित लढत निश्चित झाली. निकम यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक आनंद भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना झाल्याचे बोलले जाते.

लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी शेलारांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. जे सुधीर मुनगंटीवार यांना जमले नाही, ते शेलारांनी करून दाखविल्यामुळे उत्तर मध्य मुंबईचा डाव शेलारांनी जिंकल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

भारतीय जनता पक्षाकडून एकेक मतदारसंघाची व्यूहरचना केली जात असताना मुंबईतील उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आणि त्यांचे मतदान या मतदारसंघात असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते.

काँग्रेसचे खासदार सुनील दत्त आणि नंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१४च्या मोदी लाटेत भाजपने हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून घेतला. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन सलग दोन वेळा इथून चांगल्या फरकाने निवडून आल्या.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जे सर्व्हे केले त्यामध्ये पूनम महाजन यांच्यासाठी हा मतदारसंघ पोषक नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे येथील उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या.

पूनम महाजन यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळणार नाही, असे भाजपच्या गोटातून ठामपणे सांगण्यात येत होते. त्यामुळे स्वाभाविकच लोकसभा निवडणुकीच्या खूप आधीपासून भाजपने या मतदारसंघासाठी उमेदवाराचा शोध सुरू केला होता.

भाजपच्या उमेदवार शोधमोहिमेमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता अक्षयकुमारचे नावही चर्चेत आले होते. सेलिब्रिटींच्या नावांची माध्यमांतून चर्चा सुरू असताना राजकीय नेत्यांची नावेही चर्चेत येत होती.

त्यात प्रामुख्याने आशिष शेलार यांच्यासह आमदार पराग आळवणी आणि अमित साटम यांचीही नावे पुढे येत होती. परंतु फिरून फिरून चर्चा आशिष शेलार यांच्याकडेच येत होती. कारण मुंबई भाजपला त्यांनी दिलेले नेतृत्व, संघटनेवरील प्रभाव, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट भिडण्याची त्यांची क्षमता अशा अनेक बाबींमुळे तेच या मतदारसंघातील सर्वात प्रबळ उमेदवार ठरत होते.

शेलार यांची एवढ्यात दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा नव्हती, परंतु पक्षाने आदेश दिल्यास ती मान्य करण्याची त्यांची भूमिका होती. दरम्यानच्या काळात उज्ज्वल निकम यांचे नाव चर्चेत आले.

परंतु भाजपच्या गोटात खरोखर त्या नावाची चर्चा होती, की केवळ माध्यमांतून चर्चा होती, याचा अंदाज अनेकांना येत नव्हता. त्यामुळे उमेदवारीची माळ आशिष शेलार यांच्या गळ्यातच पडण्याची शक्यता व्यक्त होत होती.

अखेरीस शनिवारी उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आशिष शेलार यांनी डाव जिंकल्याची चर्चा रंगू लागली. चंद्रपूर मतदारसंघातून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती.

उमेदवारी मिळू नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले होते, परंतु उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. म्हणूनच जे मुनगंटीवार यांना जमले नाही, ते आशिष शेलार यांनी करून दाखविल्याचे बोलले जाते.

...तर महापालिका निवडणुकीत अडचण

उद्धव ठाकरे यांचे गर्वहरण करण्यासाठी भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्याकडून काढून घ्यायची आहे. ते आव्हान फक्त आशिष शेलार हेच पेलू शकतात, याची जाणीव असल्यामुळे मध्यंतरीच्या काळात त्यांना पुन्हा मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आणले होते. त्यांना लोकसभेला उतरवले असते तर महापालिका निवडणुकीत भाजपला अडचणी आल्या असत्या. शिवाय महापालिकेसाठीच्या भाजपच्या इच्छुकांमध्येही शेलारांच्या लोकसभेच्या चर्चेने अस्वस्थता होती.

माधुरी, अक्षयकुमारचेही नाव होते चर्चेत

भाजपच्या उमेदवार शोधमोहिमेमध्ये प्रारंभी पहिले नाव चर्चेत आले होते, ते अभिनेत्री माधुरी दीक्षितचे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माधुरी दीक्षितची भेट घेतली होती, त्यानंतर माधुरीच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. परंतु माधुरी दीक्षित यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर भाजपच्या गोटातून अभिनेता अक्षयकुमार याचेही नाव चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com