युतीमुळे विधानसभेला शिवसेनेची अंधेरी, दहिसरमध्ये वाट अवघड

युतीमुळे विधानसभेला शिवसेनेची अंधेरी, दहिसरमध्ये वाट अवघड

मुंबई - लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने एकमेकांशी जुळवून घेतले असले, तरी विधानसभेत त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील चार ते पाच जागा शिवसेनेला गमवाव्या लागतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर अंधेरी आणि दहिसरवर शिवसेनेला कायमचे पाणी सोडावे लागेल.

युती करून शिवसेनेने लोकसभेचा मार्ग सोपा करून घेतला; मात्र विधानसभेला त्याचा फटका बसू शकतो. २०१४ च्या निवडणुकीत मनसेकडे असलेल्या मतदारांनी भाजप विरोध म्हणून शिवसेनेला भरभरून मतदान केले होते. मात्र, आता शिवसेना-भाजप सोबत राहणार असल्याने हा मतदार पुन्हा मनसेचा पर्याय स्वीकारणार असल्याचे स्पष्ट आहे.

खासकरून मराठीबहुल आणि मनसेची ताकद असलेल्या भागांमध्ये शिवसेनेला फटका बसू शकतो. त्यात, वरळीत शिवसेना-मनसेच्या लढाईचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. तशीच परिस्थिती अणुशक्ती मतदारसंघात होईल. चेंबूरमध्ये शिवसेना-मनसेमध्ये होणाऱ्या लढाईचा फायदा काँग्रेसला होईल. शिवडी, विक्रोळी आणि मागठाणे मतदारसंघांत शिवसेना वरचढ ठरू शकते. 

अंधेरी पश्‍चिम आणि वर्सोवा मतदारसंघांत भाजपचे आमदार असल्याने त्या जागा शिवसेनेला मिळणार नाहीत. एकेकाळी महापालिका निवडणुकांमध्ये हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला होता. विधानसभा निवडणुकीत वर्सोवा येथे शिवसेनेच्या उमेदवाराने अर्जात चूक केल्याने तो बाद ठरला होता. त्यामुळे वाटाघाटीत शिवसेनेला या जागा भाजपलाच जाण्याची शक्‍यता आहे. 

दहिसरही भाजपकडे?
२००९ च्या निवडणुकीत दहिसर मतदारसंघातून शिवसेनेचे विनोद घोसाळकर निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसून तेथे भाजपच्या मनीषा चौधरी निवडून आल्या होत्या. त्यामुळे हा मतदारसंघही भाजपकडे राहण्याची दाट शक्‍यता आहे.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com