Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

सेकंदाच्या काट्यावर धावण्याची सवय असलेले मुंबईकर आज मतदानाच्या रांगेत चांगलेच अडकले.
Voting Line
Voting Linesakal

मुंबई - सेकंदाच्या काट्यावर धावण्याची सवय असलेले मुंबईकर आज मतदानाच्या रांगेत चांगलेच अडकले. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडलेल्या मुंबईकरांना चार ते सहा तास रांगेत उभे राहावे लागले. मतदानासाठी रांगा लावलेल्या मुंबईकरांच्या उत्साहावर निवडणूक यंत्रणेने पाणी ओतले.

धारावीसारख्या झोपडपट्टीतल्या रहिवाशांपासून मुकेश अंबानींसारख्या उद्योगपतींपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपासून बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत विविध स्तरांतल्या मतदारांचा समावेश असलेल्या मुंबईतील मतदारांचा प्रतिसाद हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो.

मुंबईतल्या मतदानाकडे देश-विदेशातील प्रसारमाध्यमांचे विशेष लक्ष असते. महाराष्ट्रातील अन्य ग्रामीण भागाच्या तुलनेत मुंबईतील टक्केवारी नेहमीच कमी असते. मतदानाला लागून दोन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेक मुंबईकर पर्यटनाला गेल्याचे आणि मुंबईनजीकची पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून येऊ लागल्या होत्या.

तरीसुद्धा मुंबईच्या विविध भागांमध्ये सकाळपासून दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले. राज्यात यापूर्वी मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने मतदान पार पडले आहे, तरीसुद्धा मतदान धीम्या गतीने झाल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळाल्या नाहीत. चार टप्प्यांच्या विपरीत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान धीम्या गतीने होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.

अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि प्रचंड उकाड्यात लोकांनी उत्साहाने मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. परंतु अनेक तास रांगेत उभे राहावे लागल्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या त्रासामुळे काही ठिकाणी लोक मतदान न करताच परत गेल्याचेही पाहावयास मिळाले.

अनेक तास लोकांना उन्हात उभे राहावे लागलेच, परंतु पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही मतदान केंद्रांवर करण्यात आली नसल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळाल्या. ज्येष्ठ नागरिकांमुळे मतदान धीम्या गतीने सुरू असल्याचे काही ठिकाणी सांगण्यात येत होते, परंतु त्यात तथ्य नसल्याचे काही जणांचे म्हणणे होते. बहुतांश ठिकाणी असाच अनुभव येऊ लागल्यामुळे दुपारनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

मुंबईतील मतदानाच्या तारखेचे नियोजनही चुकल्याचीही चर्चा आज होती. साधारणपणे एक मे रोजी मुलांच्या शाळांचे निकाल लागले की लोक सुट्टीसाठी गावी जात असतात. मतदान करून लोकांनी गावी जावे, असे आवाहन करण्यात आले असले तरी मुंबईतील उकाड्याला कंटाळून मोठ्या प्रमाणावर लोक गावी निघून गेले. या बाबींचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रांगेतील मतदारांना टोकन

अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर सहा वाजता मतदान न करताच परत जावे लागणार की काय, अशी धास्तीही अनेकांना वाटत होती. परंतु, सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या सर्वांना मतदान करता येईल, असा दिलासा राजकीय पक्षाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी मतदारांना दिला. निवडणूक यंत्रणेने काही ठिकाणी सहा वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना टोकन वाटप केले. तर ज्या शाळांच्या प्रवेशद्वारावर फाटक होते, ते फाटक सहा वाजता बंद करण्यात आले.

आदेश बांदेकर- केदार शिंदे प्रतीक्षेत

पवई हिरानंदानी भागातील मतदान केंद्रावर अभिनेते आदेश बांदेकर, दिग्दर्शक केदार शिंदे यांना तीन तासांहून अधिक काळ रांगेत थांबावे लागले. ‘ईव्हीएम’ मशीनमधील बिघाडामुळे काही काळ गेला असला तरी एकूण मतदानाची प्रक्रिया धीम्या गतीने असल्याची तक्रार होती.

आयोगाकडून खुलासा

मुंबईत मतदानासाठी नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी मतदारांना ‘एक्स’वरुन निवडणूक आयोगाला केल्या. त्यावर मतदाराची ओळख पटवणे, बोटाला शाई लावणे, प्रत्यक्ष मत नोंदवणे यासाठीची वेळ लक्षात घेता रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ शकते असा खुलासा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केला आहे. आयोगाने मतदारांसाठी पिण्याचे पाणी, जागेच्या उपलब्धतेनुसार प्रतिक्षागृह, सावली अशी व्यवस्था केली असल्याचाही दावा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com