डेटिंगसाठी सुंदर मुलगी देतो सांगत लाखोंची लुट ; तिघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून डेटिंगसाठी आकर्षक व सुंदर मुली पुरविण्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली

नवी मुंबई : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून डेटिंगसाठी आकर्षक व सुंदर मुली पुरविण्याचे प्रलोभन दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली. खारघर पोलिसांनी कलकत्ता येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.

या त्रिकुटाने लोकेन्टो ऑनलाईन डेटिंगसाठी कोलकाता येथे सुरू केलेले बोगस कॉल सेंटर पोलिसांनी उद्‌ध्वस्त केले आहे.याप्रकरणी स्नेहा ऊर्फ माही रवी दास (२५), प्रबीर संतोष सहा (३५) व अर्नब सिंग ऊर्फ नील रॉय (२६) या तिघांना अटक केली आहे. यातील स्नेहा ऊर्फ माही हा तृतीयपंथी आहे. या टोळीने सप्टेंबर महिन्यामध्ये खारघर येथील ६५ वर्षीय व्यक्तीला संपर्क साधून त्यांना डेटिंगसाठी आकर्षक मुलगी पुरविण्याचे प्रलोभन दाखवले होते.

ही बातमी वाचा ः प्रिन्सीच्या हत्येचा मुख्य पूरावा मिळाला

तसेच विविध बॅंक खात्यात ऑनलाईन पैसै पाठविण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांना क्राईम ब्रॅंचच्या पोलिसांकडून अटकेची धमकी दाखवून लाखो रुपये उकळले होते. त्यामुळे या व्यक्तीने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 
त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपींकडून वापरण्यात आलेले मोबाईल फोन कोलकाता येथील एकाच ठिकाणावरून वापरण्यात आल्याचे तपासात आढळून आले. त्याआधारे कोलकातातील  डमडम भागात आर. एंटरप्रायजेस या नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा मारला. या वेळी बोगस कॉल सेंटरमधून लोकॅन्टो व स्पीड डेटिंग सर्व्हिसेसच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. 

तीन महिन्यात ६२ लाख रुपये उकळले
पोलिसांनी बोगस कॉल सेंटरमधून ४१ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप व फसवणूक करण्यात आलेल्या ग्राहकांची माहिती असलेले फॉर्म व इतर साहित्य जप्त केले. तसेच सदर कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांनी ठाणे, रायगड, पुणे, मुंबई, नवी मुंबई, बेंगलोर, चेन्नई व भारतातील विविध भागांतील ३१० लोकांना संपर्क साधल्याचे तसेच त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून तीन महिन्यांत ६२ लाख रुपये उकळल्याचे तपासात आढळून आले आहे. यात महाराष्ट्रातील ३० नागरिकांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Looted millions of rupees by seducing beautiful girls for dating; Three arrested