बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पनवेल परिसरातील गणेशोत्सव मंडळांची लगबग

नवीन पनवेल : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला पनवेल आणि परिसरामध्ये वेग आला आहे. लाडक्‍या बाप्पाच्या स्वागतासाठी लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळासह घरगुती गणेशोत्सवासाठी येथील मंडळी सज्ज झाली आहेत. 

बाजारपेठेवर असलेले मंदीचे सावट व परिसरातून पश्‍चिम महाराष्ट्रातील महापुरासाठी केलेला मदतीचा ओघ यांचा परिणाम गणेशोत्सवावर होणार असला तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. 
गणेशोत्सवामुळे ‘श्री’च्या स्वागताच्या तयारीत गणेश मंडळांसोबत बच्चे कंपनी व गृहिणीही मागे नसल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

कळंबोलीसह खांदा कॉलनी, कामोठे व शहराच्या इतर भागेंत गणेशोत्सव मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. शहरातील मुख्य भागात उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानींमुळे उत्सवाला रंगत येणार आहे. तसेच मंडळांकडून दुभाजकांना झालर लावून, यावर नाचत्या दिव्यांची विद्युत रोषणाई केली जाणार असल्यामुळे गणेशोत्सव काळात सर्व प्रमुख रस्ते उजळून निघणार आहेत.

मोठ्या मंडळांकडून यंदाही धार्मिक, महापूर व सद्य:स्थितीवर आधारित देखाव्यांवर अधिक भर दिला जाणार आहे. कळंबोलीमधील बीमा कॉम्प्लेक्‍स सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ यंदा स्त्रीशक्तीविषयी देखावा सादर करणार आहे. स्टील चेंबर गणेशोत्सव मंडळ या वर्षी कृष्णलीला हा देखावा सादर करणार असून ओम साई महिला व बाल मित्र मंडळ पौराणिक तर रोडपालीच्या एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने महापुरावर आधारित देखावा सादर करण्यात येणार आहे. 

बाजारपेठा सजल्या
गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते देणग्या, वर्गण्या व गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या इतर परवानग्या मिळविण्यासाठी व्यस्‍त आहेत. मखर, देखावे, सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या साहित्याची लगबग सुरू आहे. कुठे आकर्षक रोषणाई, तर कुठे उंचच उंच मंडप उभारणीला वेग आला आहे. आकर्षक गणेशमूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत.  मूर्तिकारांजवळ ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lord Ganesha welcome Preparation